Mon, Aug 19, 2019 05:10होमपेज › Sangli › जिल्हा बँकेची तांत्रिक भरती ‘ऑनलाईन’मध्ये सापडली!

जिल्हा बँकेची तांत्रिक भरती ‘ऑनलाईन’मध्ये सापडली!

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:04AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकांमधील नोकरभरती पारदर्शी होण्यासाठी भरतीप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी झालेला आहे. या शासन निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेकडील तांत्रिक अधिकारी, कर्मचार्‍यांच्या 25 पदांवरील रखडलेली भरतीप्रक्रिया ‘ऑनलाईन’ मध्ये सापडली आहे. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे. जिल्हा बँकेकडे आयटी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, लॉ, अकौंटंट विभागाकडील अधिकारी, कर्मचार्‍यांची 25 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दोनदा जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले होते. पहिल्या जाहिरातीवेळी 340 उमेदवारांचे अर्ज आले होते. दुसर्‍या जाहिरातीनंतर नव्याने 128 उमेदवारांचे अर्ज आले.  गेली सहा महिने ही भरती प्रक्रिया रखडली आहे. 

तांत्रिक 25 पदांवरील अधिकारी, कर्मचारी भरती ही लेखी परीक्षा न घेता केवळ मुलाखतींद्वारे केली जाणार होती. मात्र सातारा, औरंगाबाद व अन्य काही जिल्हा बँकांकडील कर्मचारी भरती वादग्रस्त ठरल्याने सांगली जिल्हा बँकेकडील तांत्रिक अधिकारी, कर्मचारी भरती प्रक्रियेत सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली.दरम्यान ‘ज्या जिल्हा बँकांमध्ये सेवक वर्ग भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा होणे बाकी आहे अशा संबंधित बँकांना व यापुढे ज्या बँकांना सेवकभरती करावयाची आहे अशा सर्व बँकांना ऑनलाईन पद्धतीने भरतीप्रक्रियेच्या शासन निर्णयाचे निकष, नियम, अटी लागू होणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेकडील रखडलेली तांत्रिक पदभरती आता ऑनलाईन पद्धतीने राबवावी लागेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे कही खुशी, तर कही गम अशी स्थिती आहे. 

कर्मचार्‍यांची 517 पदे रिक्त : ऑनलाईन प्रक्रिया लवकरच

जिल्हा बँकेचा 1 हजार 442 कर्मचारी पदांचा आकृतीबंध मंजूर आहे. बँकेकडे सध्या 925 पदे कार्यरत आहेत. 517 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवरील भरतीही रखडलेली आहे. सहकार विभागाने शुक्रवारी जिल्हा बँकांकडील भरती प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. सांगली जिल्हा बँकेकडील भरतीप्रक्रिया ‘आयबीपीएस’ अथवा अन्य पात्र संस्थेकडून राबविली जाईल, असे संकेत मिळत आहेत.