Thu, Aug 22, 2019 12:53होमपेज › Sangli › जिल्हा बँक अध्यक्ष बदल लांबणीवर

जिल्हा बँक अध्यक्ष बदल लांबणीवर

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकेचे सभा कामकाज चालू करा, योग्य वेळ आल्यानंतर अध्यक्ष बदलाबाबत पाहू, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बँकेच्या संचालकांना सांगितले. कामकाज बंद ठेवून अशाप्रकारे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे, अपमानित करून राजीनामा घेणे हे बरोबर वाटत नाही, अशी भावनाही त्यांनी संचालकांपुढे व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बदल लांबणीवर पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलासंदर्भात मंगळवारी सत्ताधारी संचालकांची इस्लामपूर येथे बैठक बोलविली होती. या बैठकीला जयंत पाटील तसेच बँकेचे ज्येष्ठ संचालक विलासराव शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक मानसिंगराव नाईक, प्रा. डॉ. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, कमलताई पाटील, श्रद्धा चरापले उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील हे योग्य वागणूक देत नसल्याची तक्रार काही संचालकांनी केली. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाल 3 वर्षे झाला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड व्हावी, अशी मागणी काही संचालकांनी केली. 

जयंत पाटील म्हणाले, संचालकांच्या तक्रारी, त्यांच्या भावना सर्व माहिती आहे. मात्र सभांना उपस्थित न राहणे, सभा कामकाज न करणे हे बरोबर नाही. अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे योग्य वाटत नाही. बँकेचे कामकाज गेली 3 वर्षे चांगले चालले आहे. अशावेळी अपमानित करून अध्यक्षांचा राजीनामा घेणे हे बरोबर वाटत नाही. संचालकांच्या भावनांचा विचार केला जाईल. बँकेचे सभा कामकाज चालू करा, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगत जयंत पाटील यांनी बैठक आटोपती घेतल्याचे सांगण्यात आले. 

संचालकांना सबुरीचा सल्ला

जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलासाठी संचालक मंडळातील एक गट आक्रमक आहे. सभा कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केलेला आहे. दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलासंदर्भात जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, अशी भुमिकाही या संचालकांच्या गटाने घेतलेली आहे. अशा स्थितीत जयंत पाटील यांनी संचालकांना सबुरीचा सल्ला देत योग्य वेळ आल्यावर पाहू, असे सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बदल लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होते.