Sun, Jul 21, 2019 05:59होमपेज › Sangli › जिल्हा बँक अध्यक्ष बदल नेत्यांच्या कोर्टात

जिल्हा बँक अध्यक्ष बदल नेत्यांच्या कोर्टात

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आठ संचालक शुक्रवारी पक्षाचे नेते जयंत पाटील यांना आष्टा येथे भेटले. अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचला. जयंत पाटील यांनी सर्व तक्रारी सविस्तरपणे ऐकून घेतल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाचा निर्णय आता नेत्यांच्या कोर्टात होणार आहे. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, काँग्रेस नेते मोहनराव कदम यांची लवकरच बैठक होईल, असे सुत्रांनी सांगितले. 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या 13 संचालकांनी आपापल्या नेत्यांकडे राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे ज्येष्ठ संचालक विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, डॉ. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, सुरेश पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, कमलताई पाटील या संचालकांनी शुक्रवारी आष्टा येथे जयंत पाटील यांची भेट घेतली. 

बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील हे संचालकांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. बँकेच्या कामकाजात संचालकांना विश्‍वासात घेत नाहीत, अशा तक्रारी मांडल्या. वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्त करण्यात येणार आहे असेही या संचालकांनी पाटील यांना सांगितले.  

‘बँकेचे अध्यक्ष बाहेरगावी गेले आहेत. ते आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेऊ. मोहनराव कदम, संजय पाटील यांच्याशीही चर्चा केली जाईल’, असे जयंत पाटील यांनी सांगितल्याचे  सुत्रांनी सांगितले. पदाधिकारी बदलाबाबत जयंत पाटील सकारात्मक दिसले, असेही काहींनी सांगितले.  अध्यक्षपदासाठी मानसिंगराव नाईक यांच्या निवडीचे संकेतही काही संचालकांनी दिले.