Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Sangli › जिल्ह्यात साथींच्या आजारांचा फैलाव

जिल्ह्यात साथींच्या आजारांचा फैलाव

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 8:37PMसांगली : टीम पुढारी

पावसाळ्याच्या तोंडावर अशुध्द पाण्यामुळे सांगली, वाळवा, शिराळा तालुक्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. सांगलीमध्ये दूषित पाण्यामुळे कावीळ आणि डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. तर शिराळ्यामध्ये एस. टी. आगारातील 40 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना काविळीची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात इस्लामपूरमध्ये काविळीची साथ होती. आता डेंग्यू साथीचीही लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वाळव्यात आता डेंग्यूची साथ

इस्लामपूर : वार्ताहर

इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील काविळीची साथ आटोक्यात येते न येते तोपर्यंत डेंग्यूचे सात रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही साथ आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात काविळीच्या साथीने थैमान घातले होते. अडीच ते तीन हजार रुग्णांना काविळीची लागण झाली होती.  तीनजणांचा बळी गेला होता. दूषित पाण्यामुळे काविळीची साथ अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. तोपर्यंत आता डेंग्यूची साथ पसरू लागली आहे. 

तालुक्यातील मालेवाडी येथे 4, नेर्ले येथे 1 तर इस्लामपुरात 2 अशा 7 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही साथ आणखी वाढण्याची भीती आहे. इस्लामपूर शहरात तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही पालिकेकडून वेळेवर औषध फवारणी केली जात नाही. यापूर्वी दूषित पाण्याने कावीळ व गॅस्ट्रोची  साथ फैलावली होती. तालुक्यातील 11 गावांतील पाण्याचे नमुनेही दूषित आले आहेत.  आरोग्य विभागाने पावसाळ्यात रोगराई पसरू नये म्हणून खबरदारी घेतल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. रोगराई रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्‍ती केल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिराळ्यात काविळीचे रुग्ण

शिराळा : वार्ताहर

दूषित पाण्यामुळे शिराळा तालुक्यातही काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. शिराळा एस. टी. आगारातील सुमारे 55 कर्मचार्‍यांना काविळीची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिराळा शहरास दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे वारंवार होत आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एस. टी. आगारातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चालक, वाहक तसेच इतर अशा 55 जणांना काविळीची लागण झाली आहे. शिराळा आगारातील व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. एस.टी. चे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. 

वैद्यकीय अधिकारी त्यांचे पथक शिराळा आगारात दाखल झाले आहे. औषधोपचार सुरू केले आहेत. रुग्ण खासगी दवाखान्यात दाखल झाले आहेत. सांगलीहून आरोग्य पथक शिराळ्यात दाखल झाले आहे. शिराळा एस.टी. आगारात मलमूत्र विसर्जन व्यवस्था योग्य नाही. एस. टी. कॅन्टीनच्या पाठीमागे दुर्गंधी पसरली आहे. शिराळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रावळ म्हणाले, शिराळा तालुक्यात काविळीची साथ आहे. मात्र  डेंग्यू, हिवताप, अशी कोणतीही साथ नाही. गावोगावी मेडिक्लोअर वाटप करण्यात आले आहे. घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. शिराळा आगारातील रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आलेले नाहीत. वैद्यकीय अधिकारी व पथक एस. टी. आगारात पाठवले आहे.

कवठेपिरान येथे डेंग्यूसदृश्य आजार

कवठेपिरान : वार्ताहर 

कवठेपिरान (ता. मिरज) येथे डेंग्यूसदृश आजार झालेला रुग्ण आढळला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. कवठेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. व्ही. नांद्रेकर म्हणाल्या, साथीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा पूर्ण कार्यान्वित करण्यात आली आहे. तीव्र ताप, शरीरातील पेशी कमी होणे, अशक्तपणा, स्नायूदुखी, उलट्या, डोके दुखणे, अंगावर पुरळ येणे अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. रुग्णांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायतीकडून गावातील कचर्‍याचा उठाव, गटारी साफ करण्याची मागणी होत आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा असे आवाहन सरपंच सोनाताई गायकवाड यांनी केले आहे.

कडेगाव तालुक्यात साथींचे रोग

कडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव शहर आणि तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून साथींच्या विविध रोगांमुळे लोक हैराण झाले आहेत. याकडे आरोग्य खाते दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे लोकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात सर्वप्रथम कडेगाव शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आला. त्यानंतर मागील दोन ते तीन महिन्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. उपाययोजना सुरू आहे.   डेंग्यूचे नऊ रुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण कडेगाव तर काही रुग्ण कराड येथे  उपचार घेत आहेत.

तासगाव तालुक्यात साथीचे आजार

तासगाव : प्रतिनिधी

शहर व तालुक्यातील अनेक गावांत गटारी अजूनही तुंबलेल्या  आहेत. यामुळे तालुक्यात साथींचा फैलाव होण्याची भीती  आहे.  शहरासह तालुक्यातील सावळज, मणेराजुरी, आरवडे, मांजर्डे, बस्तवडे, पेड, हातनूर, विसापूर, बोरगाव, शिरगाव, येळावी, कवठेएकंद, वासुंबे, कुमठे, चिंचणी या गावांत स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात पावसाळ्याच्या आगमनापूर्वीच साथीचे रोग पसरू लागले आहेत. वरचे गल्ली परिसरात चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. तसेच गॅस्ट्रो, अतिसार यासारख्या रोगांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांत आहे.