होमपेज › Sangli › इस्लामपुरात महिलांना खराब गोळ्यांचे वाटप

इस्लामपुरात महिलांना खराब गोळ्यांचे वाटप

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:32PMइस्लामपूर : वार्ताहर

जागतिक महिला दिनानिमित्त नगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात काही महिलांना खराब गोळ्यांचे वाटप झाले. विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्याच पत्नीला या खराब गोळ्यांचे पाकिट मिळाले होते. 

येथील नागरी आरोग्य केंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 105 महिलांची तपासणी करून त्यांना आयर्न अ‍ॅण्ड फोलिक अ‍ॅसिड व इतर गोळ्यांची पाकीटे देण्यात आली. हे औषध शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयात आले होते. उपनगराध्यक्ष  पाटील यांच्या पत्नीनेही या शिबिरात तपासणी करून हे औषध घेतले होते. घरी गेल्यानंतर गोळ्यांचे पाकीट फोडल्यानंतर त्यात खराब गोळ्या असल्याचे निदर्शनास आले. 

त्या गोळ्या घेऊन उपनगराध्यक्ष पाटील हे शिबिराच्या ठिकाणी गेलेे. शासनाकडून बुरशी आलेल्या गोळ्यांचे वाटप झाल्याचा आरोप त्यांनी व राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजी पाटील यांनी केला.

दरम्यान, डॉ. शेंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडून उपलब्ध झालेल्या औषधांचेच वाटप केले असल्याचे सांगितले. इतर औषधांची तपासणी केली. मात्र, त्यामध्ये खराब औषध नसल्याचे निदर्शनास आले आहे. या एका पाकिटातच खराब गोळ्या असल्याचे त्यांनी सांगितले.