Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Sangli › खरिपासाठी 692 कोटी पीक कर्ज वितरीत

खरिपासाठी 692 कोटी पीक कर्ज वितरीत

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:20PMसांगली : प्रतिनिधी 

जिल्ह्यात जून अखेरपर्यंत केवळ 25 टक्के पीक कर्ज वाटप  होते.  त्यामुळे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात कामगिरी उंचावण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील  यांनी वारंवार बँकांच्या बैठका घेवून केलेल्या पाठपुराव्याला यश आले.  यंदाच्या हंगामात खरीप पिकासाठी बँकांनी एकूण 692 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत केले. 

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 1149 कोटी 84 लक्ष पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. बँकांनी पीक कर्ज वितरणामध्ये अत्यंत संवेदनशील राहून शेतकर्‍यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामध्ये कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेऊन खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आता  बँकांनीही प्रतिसाद दिला आहे. 15 जुलैअखेर 82 हजार 629 खातेधारकांना 692 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे एल. एस. कट्टी यांनी दिली.15 जुलैअखेर बँकांनी केलेले पीक कर्ज वाटप आणि  कंसात असणारे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक  461 कोटी 95 लाख रूपये (553 कोटी 20 लाख रूपये), बँक ऑफ महाराष्ट्र 40 कोटी 87 लाख रूपये (70 कोटी), बँक ऑफ इंडिया 41 कोटी 5 लाख रूपये (79 कोटी), युनियन बँक ऑफ इंडिया 22 कोटी 86 लाख रूपये (54 कोटी 60 लाख रूपये), बँक ऑफ बरोदा 15 कोटी 18 लाख रूपये (23 कोटी 85 लाख रूपये), देेना बँक 7 कोटी 45 लाख रूपये (8 कोटी 20 लाख रूपये), कॅनरा बँक 7 कोटी 22 लाख रूपये (10 कोटी), कर्नाटका बँक 2 कोटी 28 लाख रूपये (2 कोटी 15 लाख रूपये), ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स 2 कोटी 8 लाख रूपये (52 लाख), सिंडीकेट बँक 1 कोटी 4 लाख रूपये (1 कोटी 85 लाख रूपये).

प्रयत्न करूनही आतापर्यंत 60 टक्केच कर्ज वितरण

शेतकर्‍यांना पेरणीपूर्व मशागती करणे, खत, बियाणे   खरेदी  करणे यासाठी पैशाची गरज असते. अनेक शेतकर्‍यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास सावकारांच्याकडे जावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करावे, असे आदेश शासनाचे आहेत. तरीसुद्धा आतापर्यंत 60 टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे.