Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Sangli › काँग्रेससमोर नेत्यातीलच गटबाजीचे आव्हान

काँग्रेससमोर नेत्यातीलच गटबाजीचे आव्हान

Published On: May 05 2018 1:37AM | Last Updated: May 05 2018 1:31AMसांगली ः अमृत चौगुले

काँग्रेसने मिरजेत सभा आणि सांगलीत व्हिजन 2019 कार्यकर्ता शिबिराद्वारे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता भाजपविरोधी एल्गारही झाला आहे. अर्थात हे करताना राज्यस्तरीय नेत्यांबरोबरच स्थानिक नेत्यांनीही गटबाजी आणि जिरवाजिरवीच्या राजकारणाचा फटका बसल्याची जाहीर कबुलीही दिली आहे. एकदिलाने लढू असेही जाहीर केले. पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होणार का? की पुन्हा मोठी ताकद असूनही निव्वळ गटबाजी, जिरवाजिरवीतून सत्ता गमावणार, हे नेत्यांच्या दिलजमाईवर ठरणार आहे. 

जिल्ह्यात महापालिका, लोकसभा आणि सांगली वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस -राष्ट्रवादीचाच बोलबाला होता. अगदी महापालिकेतही आजपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच ताकद मोठी आहे. यामध्ये राष्ट्रवादीपेक्षाही महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी आहे, हे आजही उघड आहे.

परंतु दुर्दैवाने गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने भाजपला बळ दिले तरी काँग्रेसच्या गटबाजीतून वजाबाकीचेच राजकारण झाले. तेही भाजपच्या पथ्थ्यावर पडले आहे. यातून शून्यातून सर्वत्र भाजप ताकदवर पक्ष बनला आहे. चार आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींतही भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनला आहे. 

पण महापालिका क्षेत्रात त्यांना म्हणावे तसे पाय रोवता आले नाहीत. आता या निवडणुकीत त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु आजही महापालिकेत काँगेसची मोठी ताकद आहे. अर्थात या ताकदीला गेल्या चार-साडेचार वर्षांत गटबाजीचे मोठे ग्रहण लागले आहे. याचा फटका साहजिकच मागील लोकसभेला प्रतिक पाटील आणि विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांना बसला. यात मोदी लाटेबरोबरच राष्ट्रवादीच्या साथीसोबतच काँग्रेसच्या गटबाजीची मोठी भर पडली होती.

आता तर  मदनभाऊ गट, विशाल पाटील गट अशी दुफळी निर्माण झाली आहे. मनपातही पदाधिकार्‍यांत गटबाजी आहे.  कोणाचेही नसलेले मिरजकर दिग्गज नगरसेवक आज काँग्रेसच्या विरोधात गेले आहेत. अशा परिस्थितीही नुकत्याच झालेल्या मिरजेतील मेळाव्यात काँग्रेसने रणशिंग फुंकताना नेत्यांच्या एकीचा नारा दिला. याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कानपिचक्या दिल्या आहेत. त्यानुसार नेत्यांनी तसे कबूलही केले आहे. अर्थात कठीण परिस्थिती असल्याचे आणि याची जीरव, त्याची जिरव होणार नसल्याचेही कबूल केले आहे. पण अजून घोडा-मैदान पुढे आहे. 

मनपासाठी मोठी ताकद असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुकही मोठे आहेत. यामध्ये भ्रष्टाचार असलेल्यांपासून ते निष्क्रियतेचे बालंट असलेल्यांना दूर ठेवावे, असा सूरही कार्यकर्त्यांतून सुरू आहे. यातून उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. त्यातून हा माझा-तो तुझा असा उमेदवारी खेळ रंगून पुन्हा वर्चस्ववाद निर्माण होणार, हे उघड आहे. यातूनच हा सर्व एकीचा मेळ कसा जमतो, हे न उलगडणारे कोडे आहे. तो सारिपाट कसा रंगेल, यावरच काँग्रेसचे मनपा सत्तेचे आणि पुढे नेत्यांचेही विधानसभा, लोकसभेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.