Fri, Jul 19, 2019 14:08होमपेज › Sangli › जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनाचा वाद पेटला

जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनाचा वाद पेटला

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 10:27PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या महत्वाकांक्षी 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा वाद चांगलाच पेटला आहे.  सत्ताधारी काँग्रेसने रविवारी शक्‍तिप्रदर्शनासह प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे मनसुबे रचले आहेत. परंतु आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसार उद्घाटन समारंभास खासदार आणि दोन्ही आमदारांनाही निमंत्रित करावे लागेल, असा पवित्रा घेतला आहे.त्यातच शिवसेनेनेही या प्रकल्पावर हक्क सांगत उद्घाटनासाठी निमंत्रण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना व प्रशासनाच्या संघर्षात योजनेचे उद्घाटन वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन हा श्रेयवादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सांगली व कुपवाडला मुबलक व शुद्ध पाणी देण्यासाठी 70 एमएलडी अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र  कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी या प्रकल्पाचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा काँग्रेसने घाट घातला आहे.   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. माळबंगला येथेच हा कार्यक्रम घेऊन तेथेच मेळावा घेण्याचे काँग्रेसने नियोजन केले आहे. त्यावेळी जोरदार शक्तीप्रदशर्नाची जय्यत तयारी सुरू केली आहे. 

काँग्रेसची ही ‘फिल्डिंग’ आयुक्त रविंद्र खेबूडकर यांच्या सुचनेमुळे अडचणीत आली  आहे. प्रोटोकॉलनुसार उद्घाटन   समारंभास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांनाही निमंत्रित करणे आवश्यक असल्याची भूमिका  आयुक्तांनी घेतली आहे. हे तिघेहीजण भाजपचे आहेत.  त्यामुळे त्यांचीही नावे निमंत्रण पत्रिकेवर नमूद करण्याच्या आयुक्तांच्या सुचनेमुळे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसमोर पेचप्रसंग उभा राहिला आहे.

आयुक्तांच्या सुचनेला महापौर हारुण शिकलगार व काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. पाणी प्रकल्प काँग्रेसच्याच सत्ताकाळात पूर्ण झाल्याने त्याचे श्रेय आमचेच आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उद्घाटनातच हे पाणी पेटणार आहे. या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. नगरसेवक शेखर माने यांनी हा प्रकल्प 90 टक्के शासन निधीतून असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारमध्ये शिवसेनाही 50 टक्के भागीदार आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभात शिवसेनेलाही महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे, असा पवित्रा  माने यांनी घेतला आहे. तसेच शुद्धीकरण प्रकल्पाचे ठिकाण ही सार्वजनिक जागा आहे. तसेच कार्यक्रम शासकीय आणि महापालिकेचा आहे.  तिथे काँग्रेसला मेळावा घेता येणार नाही. तिथे मेळावा घेतल्यास आम्ही स्वतंत्रपणे उद्घाटन समारंभ करू असा इशारा त्यांनी दिला आहे.  या  वादामुळे आणि तीन गटांकडून वेगवेगळ्या सुचना येत असल्यामुळे या संघर्षात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे. 

उद्घाटनासाठी वेगवगेळा दावा

महापौर हारुण शिकलगार म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही योजना मंजूर करून नारळ फोडला होता. काँग्रेसच्या काळात योजना पूण झाल्याने त्याचे श्रेय आमचेच आहे. शेखर माने म्हणाले, योजना पूर्णत: शासनाच्या निधीतून झाली आहे. शिवाय योजना पूर्णत्वासाठी आम्ही पाठपुरावा केला. महापौरांसह काँग्रेसचे योगदान काय,त्यामुळे उद्घाटनाचे श्रेय त्यांना घेऊ देणार नाही.आयुक्‍त खेबुडकर म्हणाले, उद्घाटनाला आमची हरकत नाही. पण प्रोटोकॉल पाळून सर्वांना बोलावणे गरजेचे आहे. आम्ही का अडचणीत येऊ?