Tue, Oct 22, 2019 02:03होमपेज › Sangli › विकेंद्रित यंत्रमाग उद्योगास सवलती द्या

विकेंद्रित यंत्रमाग उद्योगास सवलती द्या

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 10:45PMविटा : प्रतिनिधी

जीएसटीच्या ई वे बिल प्रणालीच्या काही किचकट तरतुदीमधून विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योगास सवलती देणे आवश्यक असून याबाबतीमधील निवेदन अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार व जीएसटी आयुक्त राजीव जलोटा यांना विटा यंत्रमाग संघाच्यावतीने देण्यात आले आहे.

याबाबत संघाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, संपूर्ण देशामध्ये दि. 25 मेपासून जीएसटी कायद्याअंतर्गत 50 हजारांपेक्षा जास्त किंमतीच्या माल वाहतुकीसाठी माल रवाना करताना संगणक प्रणालीच्या माध्यमातून ई वे बिल तयार करुन  मालाच्या देयकासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायामध्ये यंत्रमाग उद्योजकाने सूत खरेदी केल्यानंतर त्या सुतापासून कापड उत्पादन करुन विक्री करेपर्यंत वार्पिंग, सायंझींग, रिवायडिंग, जॉबवर्क, रंगप्रक्रिया या वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी ते सूत व कापड अनेकवेळा वाहतूक करुन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावे लागते व त्यानंतर तयार कापडाची विक्री करुन ते संबंधित खरेदीदारास पाठवावे लागते. यातील बरीचशी वाहतूक गावातल्या गावात केली जाते. 

ई वे बिलाच्या सध्याच्या नियमानुसार या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वेळी नवीन ई वे बिल तयार करावे लागते व या ई वे बिलामध्ये वाहन क्रमांकासह तपशील भरावा लागत आहे. तसेच ई वे बिलाच्या मालाची वाहतूक 24  तासांत पूर्ण करणे अनिवार्य आहे.

मात्र दैनंदिन व्यवहारामध्ये या प्रत्येक टप्प्यावर वाहतुकीसाठी  कोणते वाहन वापरले जाणार आहे व ती वाहतूक लगेचच होईल का ते अनेकवेळा निश्‍चित नसते. त्या-त्या वेळी उपलब्ध असेच ते वाहन वापरले जाते. त्यामुळे  ई वे बिल बनवताना यंत्रमाग व्यवसायिकांना गैरसोयीचे ठरत आहे. यासाठी सूत खरेदीपासून ते कापड विक्रीपर्यंतच्या मधल्या सर्व टप्प्यावरचे ई वे बिल बनविण्यातून  विकेंद्रीय यंत्रमाग व्यवसायिकांना सवलत व सूट द्यावी तसेच 90 कि. मी. च्या आतील अंतराच्या वाहतुकीसाठी  ई वे बिल बंधनकारक ठेऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गुजरात व तामिळनाडू राज्य शासनाने त्या ठिकाणच्या विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योगांसाठी अशा सवलती लागू केल्या आहेत. तरी आपल्या राज्यातील यंत्रमाग उद्योजकांना या सवलती लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी ही माहिती दिली