Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ तालुक्यात रुग्णालयांत हलगर्जीपणा

कवठेमहांकाळ तालुक्यात रुग्णालयांत हलगर्जीपणा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:07PMकवठेमहांकाळ : गोपाळ पाटील

कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही कवठेमहांकाळचे उपजिल्हा रुग्णालय हे ‘रेफर रुग्णालय’ झाले आहे.  थंड-तापाचे आणि नियमित उपचार वगळता, शस्त्रक्रिया आणि अन्य बाबी या ठिकाणी केल्या जात नाहीत. रुग्णाला दिली जाणारी वागणूक, केले जाणारे उपचार यामुळे हे रुग्णालय कायम चर्चेत राहिले. त्याचबरोबर तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आठपैकी तीन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्‍त आहेत. सेवा देण्यातील हलगर्जीपणा येथेही कायम आहे.कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुणालयात करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. इमारत बांधण्यात आली. खाटांची संख्या वाढविण्यात आली; मात्र रुग्णसेवा मात्र ‘जैसे थे’ च राहिली. 

याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र त्यामध्ये केवळ महिन्या दोन महिन्यांच्या सुधारणा होतात, त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ स्थिती असते.बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय असूनही होत नाहीत. सोनोग्राफीच्या मशीनचा तत्कालीन आरोग्य सभापती गजानन कोठावळे यांनी पाठपुरावा केला. अवघ्या एक महिन्यांत मशीन देण्याचे आश्‍वासन देण्यात आले; मात्र आता पाच वर्षानंतरही हे मशीन मिळालेले नाही. एक्स रे मशीनची सुविधाही अनेकवेळा बंद असते. रुग्णांना पिण्याचे पाणीही निटपणे मिळत नाही. सुविधा मिळत नाहीतच; पण संवादही नीटसा साधला जात नसल्याच्या तक्रारी रुग्ण करताना दिसतात.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढालगाव, रांजणी आणि  आगळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेत राहिले आहे. ढालगावमध्ये शवविच्छेदनाची सोय असूनही ते केले जात नसल्याची स्थिती कायम आहे. 

त्याचवेळी आगळगावच्या वैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशीतून बदली झाली आहे. त्यातच तालुक्यात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आठ जागा मंजूर असताना केवळ पाचच आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. नियमित बाळंतपण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि ओपिडी करणारे दवाखाने झाले आहेत. गावोगावांतून आरोग्य कर्मचार्‍यांविषयी तक्रारी आहेत.

उपजिल्हा रुग्णालय बनले ‘रेफर’

गेल्या काही वर्षांत कवठेमहांकाचे उपजिल्हा रुग्णालय केवळ सांगली-मिरजेकडे रुग्ण पाठविण्याचे म्हणजे ‘रेफर हॉस्पिटल’ झाले आहे. दररोजची ओपीडी, क्षय, दमा आदी रोगावरील आणि अपघातातील किरकोळ जखमींवर उपचार सोडले तर कोणतेही मोठे उपचार या ठिकाणी केले जात नाहीत. प्रमाणपत्र देण्याचे काम करण्यात येथील अधिकारी धन्यता मानत आहेत.