Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Sangli › वंचित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

वंचित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 8:45PMइटकरे : धनाजी चव्हाण

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी  कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली, मात्र या योजनांपासून  वंचित राहिलेल्या शेतकर्‍यातून संतप्‍त प्रतिक्रिया येत आहेत. लाभापासून वंचित राहिलेले हे शेतकरी अजूनही आपले नाव यादीत पाहण्यासाठी प्रतीक्षा करू लागले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफी निकषात लवचिकता आणण्याची मागणी या वंचित शेतकर्‍यांमधून होऊ लागली आहे.
राज्य शासनाने कर्जमाफीसाठी दि. 30 जून 2016 पूर्वीची थकबाकी गृहित धरली आहे तर पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यासाठी  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 ही कर्ज उचलीची तारीख गृहित धरली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी थोड्याच कालावधीत कर्ज उचल मागे-पुढे झाल्यामुळे कर्जमाफी व पीक प्रोत्साहनापासून वंचित रहावे लागले आहे.

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 हे आर्थिक वर्ष असले तरी कर्ज उचलीसाठी व परतफेडीसाठी आर्थिक वर्ष हे पूर्वीपासून 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर हे कर्ज उचल करण्यासाठी व परतफेडीसाठी 30 जून ही तारीख नेहमी धरली जाते. 

त्यामध्ये राज्य शासनाने एक महिना वाढ म्हणजे 31 जुलैपर्यंत पाठविण्यात आली आहे. मात्र बहुसंख्य शेतकरी शासनाने कर्ज उचलीची तारीख चुकीच्या पद्धतीने धरली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.  कर्ज उचलीची तारीख शासनाने चुकीच्या पद्धतीने धरल्यामुळे सन 2014-15 सन 2015-16 मधील कर्ज उचल करणारे सर्वच  शेतकरी यामध्ये पीक प्रोत्साहनास पात्र झालेले नाहीत. त्यामुळे त्याच वर्षासाठी कर्ज घेणारे सर्व शेतकर्‍यांना लागू होणे गरजेचे होते. परंंतु उचल तारीख आर्थिक वर्षाच्या निकषावर धरल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना वेळेत कर्ज परतफेड करूनदेखील राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे.

राज्य शासनाच्या दिलेल्या कर्ज उचलीच्या तारखेप्रमाणे रक्कम वेळेत भरली आहे. परंतु नव्याने कर्ज थकबाकी झाली आहे. अशा शेतकर्‍यांना देखील शासनाने पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ देणे थांबविले आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.  याचा विचार करुन राज्य   शासनाने कर्जमाफीपासून वंचित शेतकर्‍यांसाठी निकषात बदल करावा, अशी शेतकर्‍यांतून मागणी होत आहे.

Tags : sangli, sangli news, Disadvantaged farmers awaiting debt relief