होमपेज › Sangli › वंचित ऊस उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान लाभ 

वंचित ऊस उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान लाभ 

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:44PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने सुधारित निर्णय जारी केला आहे. कर्जवसुलीची मुदत पिकाच्या हंगामाशी निगडित केल्याने वंचित राहिलेले ऊस उत्पादक शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. सांगली जिल्ह्यातील नव्याने 50 हजार शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारासह पश्‍चिम महाराष्ट्रातील नियमित कर्जफेड केेलेल्या ऊस उत्पादकांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ होणार आहे. 

आडसाली ऊस हे अठरा महिन्यांचे पीक आहे. या पिकाच्या कर्जवसुलीसाठी अठरा ते वीस महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र नियमित कर्जफेडीची शासनाची मुदत ही पिकाच्या हंगामाशी निगडीत नव्हती. त्यामुळे बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार होते.

उसाच्या कर्जाची वसुली ही कारखान्यांच्या माध्यमातून लिंकिंग पद्धतीने होत असते. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या कमी आहे. या शेतकर्‍यांना नियमित कर्जफेडीबद्दल प्रोत्साहन अनुदानाची गरज होती. 

शासनाने ही गरज ओळखून सुधारित निर्णय जारी केला आहे. सन 2016-17 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा देय दिनांक दि. 31 जुलै 2017 नंतर असल्यास अशा कर्जाच्या बाबतीत त्या शेतकर्‍यांना सन 2015-16 या कालावधीत कर्ज घेतलेल्या व दि. 31 जुलै 2017 पर्यंत संपूर्ण परतफेड केलेल्या रकमेवर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील विशेषत: नदीकाठचे सुमारे 50 हजार शेतकरी 25 हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाच्या तिसर्‍या टप्प्यातील पात्र शेतकर्‍यांची सुधारित यादी दि. 6 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली होती. या  यादीत 65 हजार 545 शेतकर्‍यांचा समावेश होता. काही त्रुटींमुळे दि. 7 रोजी सुधारित यादी आली. त्यामध्ये 38 हजार 807 शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्रुटी दुरुस्तीनंतर संबंधित शेतकर्‍यांची यादी येणार आहे. शासनाच्या सुधारित निर्णयामुळेच जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानपात्र शेतकर्‍यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.