Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Sangli › अखेर धोत्रेआबा झोपडपट्टीधारक हक्‍काच्या घरात

अखेर धोत्रेआबा झोपडपट्टीधारक हक्‍काच्या घरात

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 10:23PMसांगली : प्रतिनिधी

येथील शिंदे मळा लव्हली सर्कलजवळील धोत्रेआबा झोपडपट्टीतील 93 कुटुंबांना अखेर आठ वर्षांनी महापालिकेकडून हक्‍काचे सुसज्ज घरकूल मिळाले. त्यामुळे ऊन-पावसात रस्त्यावर होणार्‍या हालअपेष्टा संपल्या. शिवाय, त्यांच्या स्थलांतरामुळे आरवाडे पार्क, सुंदर पार्क, वृंदावन सोसायटीसाठी असलेल्या या मुख्य मार्गाने मोकळा श्‍वास घेतला. 

केंद्राच्या झोपडपट्टीमुक्‍त योजनेंतर्गत घरकूल योजनेसाठी 2008 मध्ये 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामध्ये सुमारे 4 हजार घरकुलांचा समावेश होता. मध्ये धोत्रेआबा झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच समावेश होता. त्याचा तत्कालीन महाआघाडीच्या काळात मुहूर्त लागला; परंतु झोपडपट्टी पुनर्वसनाचे राजकारण झाले. काहींनी बैठ्या घरांचे राजकारण करीत घरकूल योजनेलाच विरोध केला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या घरकूल योजनांची कामे रद्द करण्याची वेळ आली; परंतु धोत्रेआबा झोपडपट्टीधारकांनी मात्र या योजनेला सहकार्य केले. 

त्यानुसार येथील 69 झोपडपट्टीधारकांचे तेथेच तात्पुरते मुख्य रस्त्याकडेला पत्र्यांचे शेड मारून स्थलांतर केले होते. अर्थात या घरकुलांची कामे वर्षभरात पूर्ण करून देणे बंधनकारक होते; परंतु प्रशासन-कारभारी आणि ठेकेदार कंपनी यांच्या अनागोंदी कारभारामुळे घरकुलांची कामे वेळेत झाली नाहीत. बिलांची उधळण करूनही कामे वेळेत झाली नव्हती.  स्लॅबची कामे निकृष्ट झाली होती. याबाबत महासभा, स्थायी सभेत वादंगही झाला होता. 

दुसरीकडे या घरकुलांना घरांच्या आशेने ऊन, पावसाळ्यात रस्त्याकडेला हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यांनी घरकुले लवकर पूर्ण करून देण्यासाठी आंदोलनेही केली. तरी दखल घेतली नव्हती. अखेर ठेकेदाराने वेळेत न काम केल्याबद्दल त्याला पाच वर्षांपूर्वी काळ्या यादीत काढण्याची कारवाई करण्यात आली. शिवाय दुसर्‍या कंपनीला  काम देण्यात आले. त्यानंतरही कामाची कासवगती राहिली. प्रत्येकवेळी पावसाळ्यापूर्वी, दिवाळीपूर्वी घरे देऊ, अशी प्रशासन, पदाधिकार्‍यांकडून आश्‍वासनेच मिळत राहिली होती. अशा अवस्थेतच नागरिकांनी आठ वर्षे काढली.

घरांची कामे पूर्ण होऊनही तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ घरकुलांच्या वाटप आणि ताब्याचा वाद होता. यावरही सामंजस्याने तोडगा निघाला. त्यानुसार 30 मे रोजी 93 घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी आपापल्या रस्त्यावरच्या झोपड्या हटविल्या. नव्या घरकुलात पावसाळ्यापूर्वी प्रवेश केला. आाठ वर्षांनी त्यांचे हक्‍काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. सोबतच या झोपड्या रस्त्यावर असल्याने आरवाडे पार्क, सुंदरनगर, वृंदावन सोसायटीतील नागरिकांना त्रास होत होता. आता तोही संपुष्टात आला आहे.

असा आहे घरकुलांचा लेखाजोखा

या घरकूल योजनेत बी1, बी 2, बी 3 अशी एकूण 93 घरकुले आहेत. गेल्या  2008 मध्ये 1.39 लाखांचे घर आता 2018 मध्ये विलंबामुळे 3.69 लाख रुपयांवर गेले. त्यासाठी लाभार्थी हिस्सा 12.50 हजा हजार रुपये भरण्यात आला. उर्वरित शासन निधी आणि महापालिकेने निधी घातला आहे. या 93 घरकुलांमध्ये धोत्रेआबा घरकुलतील 69, टिंबर एरिया चेतना अपार्टमेंटजवळील 19 तर बालहनुमान झोपडपट्टीतील 5 लाभार्थ्यांचा समावेश आहे. 

घरकुलांच्या सोसायट्या अन् देखभालीची व्यवस्था

नगरसेवक संतोष पाटील म्हणाले, या घरकुलांचा 30 मे रोजी ताबा देताना त्या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची खबरदारी घेतली आहे. यासाठी 3 इमारतींच्या 3 सोसायट्या, त्यांचे अध्यक्ष व समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. प्रत्येक घरकूलधारकाकडून 100 रुपये मासिक वर्गणी काढण्याची सोय केली आहे. त्यातून विद्युतदिवे, स्वच्छता, सामुदायिक पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येणार आहे.  घरकुलांची मालकी ही कुटुंबातील महिलेच्या नावे देण्यात आली आहे.  त्यामुळे घरकुलांची परस्पर खरेदी-विक्री होणार नाही.