Fri, Apr 19, 2019 08:36होमपेज › Sangli › धूम स्टाईलने अडीच लाखांचे दागिने लंपास

धूम स्टाईलने अडीच लाखांचे दागिने लंपास

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:59AMजत : प्रतिनिधी

वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पूजेसाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील सात तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी बुधवारी दुपारी धूम स्टाईलने लंपास केले. बाजारभावाने त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. भरदिवसा व पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

उमा विष्णुपंत साळे (रा. मंगळवार पेठ) असे दागिने चोरीस गेलेल्या विवाहितेचे नाव आहे. उमा साळे  त्यांच्या जाऊबाईंसोबत  प्रांत कार्यालय परिसरातील वडाची पूजा करण्यासाठी जात होत्या.महसूल कॉलनीत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी धूम स्टाईलने त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारला. काही समजायच्या आतच चोरटे दुचाकीवरून विद्यानगरच्या दिशेने वेगात निघून गेले. पाच तोळ्यांचे मंगळसूत्र व दोन तोळ्यांचा राणीहार असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तोंडाला रूमाल बांधले होते. एकाच्या अंगात करड्या; तर दुसर्‍याच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट होता. दागिने चोरीस गेल्यानंतर उमा व त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी आरडा-ओरडा केला. मात्र, चोरटे अतिशय वेगाने निघून गेले. प्रांत कार्यालय, पोलिस ठाणे या परिसरात महसूल कॉलनी आहे. या गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वटपूजेस जाणार्‍या महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. चोरीबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.