Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Sangli › नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 19 2017 1:15PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य एजंट धीरज पाटील याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान धीरजने स्वतः मलेशियात वेटर म्हणून नोकरी केली होती. त्यामुळे त्याचे स्थानिकांशी संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातूनच त्याने युवकांना मलेशियात पाठविले होते अशी माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.  

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पोलिसपुत्र कौस्तुभ पवारला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणात फरारी असलेल्या धीरज पाटीलला रविवारी पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अनेक बाबी पुढे आल्याचे सांगण्यात आले. धीरज याने एक वर्षापूर्वी मलेशियात वेटर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याची स्थानिकांशी ओळख  झाली होती. त्यातून येथील तरूणांना नोकरीसाठी मलेशियात पाठविण्याची शक्‍कल त्याला सुचली. 

यासाठी तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्याने कौस्तुभ पवारचा वापर केला. त्या तरूणांकडून प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन त्यांना मलेशियात पाठविण्यात येत असे. येथून तिरूविरापल्ली (ओरिसा) येथे रेल्वेने आणि तेथून विमानाने तरुणांना मलेशियात पाठविले जात असल्याची कबुली धीरजने दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान या दोघांनी एकूण पंधरा जणांना मलेशियात पाठविले होते. त्यापैकी चौघांना तेथील न्यायालयात शिक्षा झाली आहे. तर अन्य तरूण भारतीय दूतावासात शरण आले आहेत. शरण आलेल्या तरूणांना भारतात परत पाठविण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.