Sat, Apr 20, 2019 08:05होमपेज › Sangli › सांगली : धर्मराजचा एन्काऊंटर, गंगाधरचे केले तुकडे

सांगली : धर्मराजचा एन्काऊंटर, गंगाधरचे केले तुकडे

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 19 2018 1:24AMजत : प्रतिनिधी

महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात खून, खंडणी, दरोडा, तस्करी यामुळे कुप्रसिध्द असलेल्या श्रीशैल चडचण टोळीचा म्होरक्या धर्मराज मल्लीकार्जुन चडचण (वय 40) याचा एन्काऊंटर केल्यानंतर त्याचा भाऊ गंगाधर याचा खून करून त्याच्या शरीराचे छोटे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चडचण पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक गोपाल हळ्ळूर याने साथीदाराच्या मदतीने सुपारी घेऊन हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चडचण पोलिसांनी हळ्ळूरसह चौघांना अटक केली आहे. 

विजयपूर (विजापूर) जिल्ह्यातील चडचण पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हळ्ळूर, त्याचे साथीदार पोलिस सिध्दारूढ रूगी, चंद्रशेखर जाधव, गंगाप्पा नायकोंडी या चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी इंडी येथील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील उमदी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणगाव येथील चडचण याच्या फार्महाऊसवर 30 ऑक्टोबर 2017 रोजी पोलिस उपनिरीक्षक हल्लूर याने केलेल्या गोळीबारात धर्मराज ठार झाला, तर याचा साथीदार शिवानंद बिराजदार हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांवर धर्मराज याने हल्ला केल्याने पोलिसांनी त्यास प्रत्यूत्तर दिले. त्या चकमकीत धर्मराज ठार झाल्याची नोंद पोलिसात करण्यात आली होती. हे एन्काऊंटर वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. 

सुपारी घेऊन खुनाचा आरोप

त्यावेळी धर्मराज याची आई विमलाबाई यांनी कर्नाटक पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. चडचण पोलिसांनी हळेउमराणी येथील सावकार महादेव भैरगोंड याच्याकडून सुपारी घेऊन माझ्या मुलाचा खून केला आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कोंकणगाव येथील धर्मराज याच्या फार्महाऊसवर गोळीबार झाला, त्यावेळी धर्मराज याचा भाऊ गंगाधरही त्याठिकाणी होता. त्या घटनेपासून गंगाधर बेपत्ता झाला होता. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांचा घातपात केल्याची तक्रार विमलाबाई चडचण यांनी केली होती. पोलिसांनी दखल न घेतल्याने विमलाबाई चडचण यांनी याप्रकरणी गुलबर्गा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने वरिष्ठ अधिकार्‍यांना चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांनी तपास सुरू केला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले.

सीआयडीने हणमंत पुजारी व सिध्दनगौडा तिकोंडी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर गंगाधर याच्या खुनाचे रहस्य उलगडले. धर्मराज याचा एन्काऊंटर झाला, त्यावेळी गंगाधरही तेथेच होता. गोपाल हळ्ळूर व पोलिसांनी पकडून गंगाधरला पुजारी व तिकोंडी यांच्या ताब्यात दिले. या दोघांनी गंगाधर याचे तुकडे करून ते भीमा नदीत फेकले, अशी कबुली दिली. त्यांच्या जबाबानंतर हळ्ळूर व त्यास मदत करणार्‍या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

श्रीशैल चडचण या टोळीची मागील वीस वर्षांपासून महाराष्ट्रातील पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तसेच कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यात मोठी दहशत होती. इंडी तालुक्यातील चडचण या गावचा मूळ रहिवाशी असलेल्या श्रीशैलचा वडील शांताप्पा याचा पुत्राप्पा भैरगोंड या सावकाराने खून केल्यानंतर श्रीशैलने सूडासाठी गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे. अनेक खून, बेकायदा शस्त्रे, चंदन, गांजा तस्करी, दरोडे, अपहरण, खंडणी असे असंख्य गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.