Mon, Aug 19, 2019 05:20होमपेज › Sangli › मुंबईत धनगरी ढोल गर्जना आंदोलन

मुंबईत धनगरी ढोल गर्जना आंदोलन

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 10:20PMसांगली : प्रतिनिधी

धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढल्यानंतर त्याच्या सांगतेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करतो, असे आश्‍वासन दिले होते. कॅबिनेटच्या अडीचशे बैठका झाल्या तरी समाजाला अद्याप न्याय मिळालेला नाही. फडणवीस यांनी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याच्या निषेधार्थ सरकारला जाग आणण्यासाठी दि. 22 मेरोजी मुंबईत मंत्रालयासमोर हजारो धनगरी ढोलांद्वारे गर्जना आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शेंडगे म्हणाले, राज्यातील धनगर समाज गेली 60 वर्षे अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी लढत आहे. विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. आजपर्यंत समाजाला कोणत्याही सरकारने न्याय दिलेला नाही. 1956 मध्ये कालेलकर समितीने अभ्यास करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. तत्कालीन केंद्र शासनाने ती मान्यही केली. त्यानंतर आरक्षणाच्या यादीत 36 व्या क्रमांकावर धनगड समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात आल्या. मात्र महाराष्ट्रात धनगड कोठेच नाहीत. धनगर ऐवजी धनगड लिहिल्याने आतापर्यंत चार पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. पंढरपूरमध्ये झालेल्या लाखोंच्या मेळाव्यात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सवलती देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र 15 दिवसांत त्यांचे सरकार कोसळले. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला अच्छेदिन दाखविण्याची ग्वाही दिली होती. मात्र ते अच्छेदिन अजून आलेच नाहीत.  या आंदोलनासाठी सर्व पक्षातील सर्व नेते, आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या आंदोलनानंतरही झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग न आल्यास तीव्र आंदोलन करू. सरकार चालवणे मुश्कील करून ठेवू. तसेच आगामी निवडणुकीत या सरकारचे पानीपत करू, असा इशाराही शेंडगे यांनी यावेळी दिला. जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरदार शेळखे, अजित दुधाळ, बाळू मंगसुळे उपस्थित होते. 

ढोलवादनाचा विश्‍वविक्रम करणार...

शेंडगे म्हणाले, यापूर्वी 1356 ढोलांच्या वादनाने विश्‍वविक्रम करण्यात आला आहे. मुंबईतील आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातून 2 हजार, सांगली जिल्ह्यातून एक हजार, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर यासह विविध जिल्ह्यातून हजारो समाज बांधव ढोलासह उपस्थित रहाणार आहेत. त्याशिवाय भाकणूक करणारे फरांडे बाबा, भगवान बाबा, दहा मठांचे अधिपतीही उपस्थित रहाणार आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत दैवतांचा जागर करत 11 हजार बांधव एकावेळी ढोल गर्जना करणार आहेत. त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नक्कीच नोंद होईल.