Thu, Apr 25, 2019 13:35होमपेज › Sangli › धनगाव योजना कामातील अडथळा दूर

धनगाव योजना कामातील अडथळा दूर

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 11:43PMआटपाडी : प्रतिनिधी

तालुक्यातील 53 गावांसाठीच्या 100 कोटींच्या धनगाव पाणी योजनेतील अडथळा अखेर दूर झाला आहे. खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत धनगाव येथील ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेतून शेतकर्‍यांच्या सहमतीने या प्रश्‍नावर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. धनगाव योजना मार्गी लागणार असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

धनगाव येथे शेतकर्‍यांनी खासदार पाटील व अमरसिंह देशमुख यांच्यासमवेत पाणी योजनेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. पाणी योजनेच्या  शेतातून जाणार्‍या पाईपलाईनसाठी शासनामार्फत योग्य मोबदला आणि अन्य कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन खासदार पाटील यांनी दिले. त्यामुळे शेतकर्‍यांचे समाधान झाल्याने नुकसान भरपाईचे धनादेश स्वीकारण्याची तयारी  दर्शविली. या पाणी योजनेच्या पाईपलाईनसाठी योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्याने ग्रामस्थांनी  काम अडवले होते. धनगावपासून आटपाडीपर्यंतचे पाणी योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले होते. केवळ धनगाव परिसरातील 1 ते 1.5 किलोमीटरचे काम बाकी होते. त्यामुळे 100 कोटींची ही योजना रखडली होती.

जिल्हापरिषदेचे अध्यक्ष असताना  देशमुख यांनी अथक प्रयत्नातून दुष्काळी आटपाडी तालुक्यातील 53 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची ही महत्वकांक्षी योजना मंजूर करुन आणली होती. अनेक अडथळ्यांवर मात करुन पूर्णत्वास आलेली ही योजना गेल्या वर्षभरापासून  रखडली होती.