Mon, Jun 17, 2019 02:44होमपेज › Sangli › विकासकामे अडल्यावरून महासभेत रणकंदन

विकासकामे अडल्यावरून महासभेत रणकंदन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक जवळ आली असूनही विकासकामांच्या फाईल अडल्यावरून शनिवारी अंदाजपत्रकीय महासभेत अक्षरश: रणकंदन झाले. सभेला अनुपस्थित असणार्‍या आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांना टार्गेट करून महापौर हारुण शिकलगार यांच्यासह सर्वच सदस्यांनी  प्रशासनावर आगपाखड केली. सर्वपक्षीय सदस्यांनी पीठासनासमोर ठिय्याही मारला. यामुळे प्रचंड गदारोळ झाला.

यावेळी उपोषण करूनही कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी सभेतच दगड आणून त्यावर डोके आपटले. ध्वनिक्षेपकही डोक्यावर हाणून घेतला. आयुक्‍तांवर महाभियोग चालवण्याचा सर्वांनी पवित्रा घेतला; पण पुन्हा महापौर हारुण शिकलगार यांनी खेबुडकर यांच्याशी सभेतूनच मोबाईलवरून संपर्क साधला. 

त्यांनी पुढील आठवड्यात फाईल मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सर्वांच्या रागाचा पारा खाली आला.  विषयपत्रिकेच्या वाचनास सुरुवात होण्यापूर्वीच सुरेखा कांबळे यांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या प्रलंबित फाईलवरून आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी गेल्या महासभेदरम्यान उपोषणही केले होते. त्यावेळी प्रशासनाने फाईल मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. पण त्यानंतरही निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सभेला आयुक्त खेबुडकर उपस्थित नव्हते. त्यांनी सभेचा रोख पाहूनच गेल्या चार-पाच महिन्यांपासून सभेची प्रशासकीय प्रमुख ही जबाबदारी उपायुक्‍त सुनील पवार यांच्याकडे सोपविली होती. आजही त्यांच्या गैरहजेरीमुळे सौ. कांबळे यांच्यासह सर्वच सदस्य संतप्त झाले. सौ. कांबळे  म्हणाल्या, मी  मागासवर्गीय व त्यातही महिला असल्यानेआयुक्त जाणीवपूर्वक माझी कामे अडवून अन्याय करीत आहेत.

श्री. शिकलगार व उपायुक्त पवार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु  त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सोबत आणलेला एक मोठा दगड डोक्यात मारून घेण्याचा प्रयत्न केला.  सौ. पद्मिनी जाधव, अनारकली कुरणे, पुष्पलता पाटील, सदस्यांनी तत्परतेने त्यांचा हात धरल्यामुळे प्रसंग टळला. त्यांची समजूत काढून अखेर तो दगड सभागृहाबाहेर नेण्यात आला. त्यानंतरही कांबळे यांनी तब्बल दोन तास उभे राहून फाईल मंजुरीसाठी जाब विचारण्यावर ठाम भूमिका घेतली. तसेच ध्वनीक्षेपकही डोक्यावर आपटून फोडायचा प्रयत्न केला.

यावेळी सत्ताधारी काँग्रेस, विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना अशा सर्वच पक्षाच्या सदस्यांनी प्रलंबित फाईलवरून सभागृह डोक्यावर घेतले. दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या फाईलींवर आयुक्त जाणूनबुजून सह्या करीत नसल्याचा आरोप केला.

 उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने म्हणाले, सदस्यांना न्याय देता येत नसेल तर ते सत्ताधारी गटाचे व महापौरांचे दुर्दैव आहे.  अपेक्षित वसुलीचे प्रशासनाचे कारण चुकीचे आहे. हा खेळ आता थांबवून सदस्यांना न्याय द्यावा.

युवराज गायकवाड म्हणाले,  प्रशासन पैसे नाहीत म्हणून विकासकामे रोखत आहे. वास्तविक कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या जात आहेत. जनता कर भरते, त्यांना सुविधा देण्यासाठी पैसा नाही अशी प्रशासन भूमिका घेते. मग यांना 80 हजार , एक लाख रुपये पगार देऊन कशाला पोसले आहे. त्यांना करवसुलीला कोण अडविले आहे. जोवर कामे होत नाहीत तोपर्यंत यांचे पगार रोखावेत.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी.

जगन्नाथ ठोकळे म्हणाले, विकासकामांसाठी निधी नाही. मग अमृत योजनेसाठी 8.16 टक्के वाढीव दराने टेंडर का मंजूर केली? ड्रेनेज योजनेला 10 कोटी रुपये कसे वर्ग केले. त्यावेळी निधी कोठून आला?

विष्णु माने म्हणाले, आयुक्त ठराविक नगरसेवकांचीच कामे करीत आहेत. इतरांच्या फाईल ते जाणीवपूर्वक अडवित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा. प्रशांत पाटील-मजलेकर, संगीता खोत, धनपाल खोत, संजय बजाज यांनीही याप्रश्नी संताप व्यक्त केला.

यावेळी सुनील पवार यांनी आयुक्‍त कोणाचीही फाईल अडवत नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्‍तांनी गेल्या वर्षंभरात 5 हजारांहून अधिक फाईल मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल 190 कोटी रुपयांची कामे मार्गी लावल्याचेही ते म्हणाले. 

 अडीच तास यावर वाद सुरू होता. अखेर  यांच्यासह अनेक महिला सदस्यांनी पीठासनासमोरच ठिय्या आंदोलन चालू केले. याला सर्वच नगरसेवकांनी साथ देत सभाच रोखली. अर्धा तास त्यांनी महापौर व उपायुक्तांना घेराव घालून ठिय्या मारला. आयुक्‍तांच्या केबिनमधून फाईल आणा. त्यांचा निर्णय  झाल्याशिवाय हटणार नाही, असा पवित्रा घेतला. 

आयुक्तांचा महिलांकडून निषेध

महिला सदस्यांनी ‘आयुक्तांचा  धिक्कार असो’, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. आयुक्तांना सभागृहात तातडीने बोलावून घेण्याची मागणीही त्यांनी केली. उपायुक्त  पवार यांनी श्री. खेबुडकर यांच्याशी संपर्क साधून सभागृहातील आंदोलनाविषयी माहिती दिली. आयुक्तांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कांबळे यांच्यासहअन्य नगरसेवकांच्या प्रलंबित फाईलींबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतरही सर्वांनी आयुक्‍त हटावची भूमिका घेतली. 

गटनेते किशोर जामदार यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, महापौरांनीच आयुक्‍तांशी स्वत: संपर्क साधून याबाबत निर्णयाची हमी घ्यावी. त्यानंतर शिकलगार यांनी सभागृहात स्पिकर फोनवरूनच खेबुडकर यांच्याशी संवाद साधला.  एप्रिलपर्यंत फाईल मार्गी लावण्याच्या हमीनंतर वादावर पडदा पडला. त्यानंतर अंदाजपत्रकीय सभेला सुरुवात झाली.

Tags : Development work, file, Obstructed, General, Assembly, confusion, sangli news,


  •