Fri, Jul 19, 2019 17:55होमपेज › Sangli › नागरी सुविधांसाठी विकास आराखडा राबवू : चंद्रकांत पाटील 

नागरी सुविधांसाठी विकास आराखडा राबवू : चंद्रकांत पाटील 

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत  जनतेने अभूतपूर्व परिवर्तन केले. भाजपकडे सत्ता सोपवली. आता  शहर विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून  तो पाच वर्षे  राबवू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

ते म्हणाले, निवडणुकीचा निकाल  म्हणजे भाजपच्या विकासावरील विश्‍वासाचा  विजय आहे. काँग्रेसने जनतेच्या गमावलेल्या अविश्‍वासाचे प्रतीक आहे. निवडणूक जिंकण्यामागे सर्वच भाजप नेते आणि कार्यकर्ते यांचे टीमवर्क कारणीभूत  असल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, जनतेत काँग्रेसबद्दल अविश्वास आणि भाजपबद्दल विश्वास होता. साडेचार वर्षांत मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने केलेल्या कामाबद्दल समाधान होते. आम्ही जे आश्‍वासन देतो, ते करतो.  काही कामांबाबत व्यावहारिक, कायदेशीर अडचणी असतात म्हणून निर्णय लांबतात, याची  जनतेला माहिती आहे. 

ते म्हणाले,  काँग्रेसने गेल्या 20 वर्षांत शहराचे  वाटोळे केल्याने  जनता  होरपळली आहे. पूर्वीच्या वीस वर्षांत तीनही शहरांची प्रगती का झाली नाही, याचे उत्तरही त्यांच्याकडे  नव्हते. त्यांनी आत्मविश्वास गमावला होता म्हणूनच  काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत आघाडी करावी लागली. मात्र ती सुद्धा भाजपच्या विकासाच्या लाटेसमोर पराभूत झाली. 

पाटील म्हणाले, काँग्र्रेसच्या कारभाराने शहरातील  नागरी सुविधांचे वाटोळे केले होते. त्यामुळे जनता सक्षम पर्याय शोधत होती. भाजपच्या रूपाने तो दिसला. काँग्रेसने जातीयवादी पक्ष म्हणत आमच्यावर अनेक प्रकारे टीका केली. पण या निवडणुकीत तो शिक्काही पुसला आहे. आम्ही दहा मुस्लिम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी आमचे नगरसेवक निवडून आले आहेत.  

गाडगीळ यांच्यासारखा स्वच्छ चेहरा हे यशाचे गमक

ना. पाटील म्हणाले,  ही निवडणूक आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवली. त्यासाठी आम्ही सर्व काम करीत होतो. पण त्यांचा स्वच्छ चेहरा  आणि प्रामाणिक प्रयत्न जनतेला आश्‍वासक वाटले.  हे निवडणुकीच्या यशाचे गमक ठरले.  काँग्रेस-महापालिकेचा भ्रष्ट कारभार जनतेने बघितला होता. पण आता विकासासाठी भाजपने आवाहन केले आहे. आमदार गाडगीळ एक पैसा घेणारा नाही. पैसे खाणार नाही, प्रसंगी पदरचे पैसे देईल, हा विश्वास  जनतेला होता. त्यामुळेच जनतेने आम्हाला यश दिले.

मुख्यमंत्र्यांचाच कंट्रोल, दर महिन्याला बैठक

ना. पाटील म्हणाले,महापालिकेच्या संपूर्ण कामकाजावर भाजपची कोअर कमिटी लक्ष ठेवेल. नगरसेवकांनी शहराच्या विकासाचेच काम करावे. त्यासाठी त्यांना  कामकाजासंदर्भात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत लवकरच प्रशिक्षण देऊ. दर महिन्याला त्यांच्या कामाचा आढावा घेऊ. शिवाय राज्यातील सर्वच महापालिकांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंट्रोल आहे. तेसुद्धा महिन्या-दोन महिन्यांनी मंत्रालयात सर्व अधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतात.