होमपेज › Sangli › मुख्य सूत्रधाराला अटक करा

मुख्य सूत्रधाराला अटक करा

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 8:18PMसांगली : प्रतिनिधी

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु खुनामागे असणार्‍या मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. 

येथील स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकर यांच्या खुनास पाच वर्षे पूर्ण झाली  आहेत. त्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात येत आहे. याप्रकरणी सीबीआयने तीन संशयितांना अटक केली आहे. अटक केलेले हे सर्वजण एका विशिष्ट विचाराच्या संघटनेशी संबंधित असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या साधकांकडे बॉम्ब, पिस्तुले, विध्वंसक शस्त्रास्त्रांचा साठा सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या विघातक कारवाया थांबल्या नसून, अजूनही त्या गुप्तपणे सुरूच आहेत. त्यात नवीन नवीन लोकांचा सहभाग दिसून येतो. त्यामुळे विघातक विचारधारेचे कार्यकर्ते तयार करण्याचे काम मुख्य सूत्रधारांकडून सुरू आहे.    पुरोगामी विचारवंतांना, कार्यकर्त्यांना या सनातनी प्रवृत्तींपासून धोका कायम आहे. सांगली, मिरज शहरात या संघटनांचे जाळे आहे. त्यांच्या सर्व साधकांवर पोलिसांमार्फत सतत पाळत ठेवणे गरजेचे आहे.  

यावेळी राहुल थोरात, डॉ. तारा भवाळकर, विजयकुमार जोखे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, जयसिंगराव मोहिते, सुहास येरोडकर, ज्योती आदाटे, शाहीन शेख, चंद्रकांत वंजाळे, प्रा. आर. बी. शिंदे, शशिकांत गायकवाड, कबीर मुलाणी, जनार्दन गोंधळी, प्रा. अमित ठकार, शंकर शेलार, प्रवीण कोकरे,  महावीर पाटील उपस्थित होते.