Tue, May 21, 2019 04:57होमपेज › Sangli › उपसभापतींचा राजीनामा; सभापतींचा आज

उपसभापतींचा राजीनामा; सभापतींचा आज

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:44PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामगोंडा संती यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे मंगळवारी राजीनामा दिला. राजीनामा मंजूर करण्यात आला. सभापती प्रशांत शेजाळ यांचा राजीनामा बुधवारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर होणार आहे. सत्ताधारी डॉ. पतंगराव कदम गट, माजीमंत्री अजितराव घोरपडे गट व मदनभाऊ गटाचे संचालक एकत्र आले आहेत. नवीन सभापतीपदाच्या शर्यतीत चार संचालक आहेत. सत्ताधारी गटाने दहा संचालक सहलीवर पाठविले असून उर्वरीत बुधवारी जाणार आहेत. 

बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांची निवड दि. 23 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाल  नोव्हेंबर 2017 मध्ये संपला आहे. नवीन सभापती निवडीसाठी काही संचालक व इच्छुकांनी दोन महिन्यांपासून फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी गटाचे नेते डॉ. पतंगराव कदम व विक्रम सावंत यांची अनेकदा भेट घेऊन नवीन निवडीसंदर्भात चर्चा केली. मात्र गेल्यावर्षी सभापती निवडीवेळी बर्‍याच घडामोडी झाल्याने सभापती बदलाबाबत कदम व सावंत यांनी सावध भुमिका घेतली होती. 

मात्र सभापती निवडीत वेगळे राजकारण, दगाबाजी घडणार नाही. डॉ. कदम ठरवतील तेच सभापती व उपसभापती होतील, असा विश्‍वास बहूसंख्य संचालकांनी दिला. त्यामुळे अखेर सभापती, उपसभापती बदलाच्या हालचालींना गती आली.  मंगळवारी विक्रम सावंत, खंडेराव जगताप यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली. सभापती, उपसभापती यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. घोरपडे गटाचे जीवन पाटील, दीपक शिंदे, जयश्री पाटील-यमगर हे संचालकही सत्ताधारी गटासोबत होते. डॉ. कदम-घोरपडे-मदनभाऊ गट एकत्र होता. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष  विशाल पाटील समर्थक संचालक अण्णासाहेब कोरे हे मात्र आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. 

दरम्यान सत्ताधारी गटाच्या नेत्यांच्या निर्देशानुसार उपसभापती संती यांनी मंगळवारी दुपारी सभापती शेजाळ यांच्याकडे राजीनामा दिला. शेजाळ यांनी संती यांचा राजीनामा मंजूर केला. शेजाळ यांचा सभापतीपदाचा राजीनामा बुधवारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी) संस्था प्रकाश अष्टेकर यांच्याकडे सादर होईल. 

पाटील, चव्हाण, गायकवाड शर्यतीत

अभिजीत चव्हाण (डफळापूर), दिनकर पाटील (सोनी), वसंतराव गायकवाड (बेळंकी), कुमार पाटील (मौजे डिग्रज) तसेच घोरपडे गटाचे जीवन पाटील (करोली एम) हे संचालक सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. 

संचालक वीस दिवस सहलीवर!

सभापती, उपसभापती नवीन निवडीत फाटाफूट होऊ नये याची दक्षता सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. मंगळवारी रात्रीच दहा संचालकांंना  सहलीवर पाठविले आहे. बुधवारी काही संचालक जाणार आहेत. नवीन निवडीस सतरा ते वीस दिवस लागणार आहेत. तोपर्यंत हे संचालक सहलीवर असणार आहेत.