होमपेज › Sangli › ग्रामसेवकाकडून 5 लाख बँकेत जमा

ग्रामसेवकाकडून 5 लाख बँकेत जमा

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:50PMजत : प्रतिनिधी

तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार स्वत: सरपंचांनीच केली आहे. या तक्रारीनंतर ग्रामसेवकाने रक्‍कम पुन्हा खात्यात जमा केली असून त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.सरपंच रकमाबाई कोळेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना भेटून तक्रार केली. ग्रामसेवकाने आपल्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन पाच लाख रुपये बँकेतून काढले. 

सुरुवातीस 24 हजार 500 रूपयांचा धनादेश लिहीला होता. त्यावर मी सही केली. त्यानंतर ग्रामसेवकांनी पुढे पाच लाख रूपये लिहिले व बँकेतून 5 लाख 24 हजार 500 रूपये काढले, अशी तक्रार त्यांनी केली. काही नेतेही याप्रकरणी राऊत यांना भेटले.राऊत यांनी तीन विस्तार अधिकार्‍यांची एक चौकशी समिती नियुक्‍त केली आहे. त्यामध्ये वाळवा, कवठेमहांकाळ व जतमधील विस्तार अधिकार्‍यांचा समावेश आहे. या समितीने रामपूर ग्रामपंचायतीस भेट दिली. सरपंच व लिपिकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीचे दप्‍तरही ताब्यात घेतले आहे.

याबाबत ग्रामसेवक भास्कर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले की, गावात पाईप लाईनचे काम करण्यात आले आहे. आणखीही काम अंदाजपत्रकात धरण्यात आले आहे. त्यासाठी धनादेशाने 5लाख24हजार500 रूपये  काढण्यात आले होते. धनादेश व खर्चाचे पत्र सरपंच यांच्या सहीने काढण्यात आले आहे.  सरपंचांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. एकदा धनादेश लिहिल्यानंतर त्याच्याआधी पाच लाख ही रक्‍कम अक्षरी लिहू शकत नाही. सरपंच साध्या रहिवाशी दाखल्यावर सही करतानाही त्यांच्या घरच्यांना दाखवून वाचून घेऊन सही करतात. मग धनादेशावर कोणालाही न विचारताच सही कशी केली?

पैसे इतरांकडे दिले नाहीत : ग्रामसेवक जाधव

याबाबत ग्रामसेवक भास्कर जाधव  म्हणाले, की दि.26 जून रोजी रक्‍कम बँकेतून काढली होती. मात्र, काम कोणी करायचे व पैसे कोणाकडे ठेवायचे, याचा गाव पातळीवर वाद सुरू झाला. त्यामुळे मी पैसे इतरांकडे दिले नाहीत. त्यामुळे खोटी तक्रार केली आहे. ती सर्व रक्‍कम गुरुवारी पुन्हा बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.