Mon, Jul 22, 2019 05:09होमपेज › Sangli › महापालिका क्षेत्रात डेंग्यूसदृश्य आजाराची साथ

महापालिका क्षेत्रात डेंग्यूसदृश्य आजाराची साथ

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 12 2018 1:03AMसांगली : प्रतिनिधी

बदलते हवामान, रिमझिम पाऊस यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: विश्रामबाग परिसर, वारणाली तसेच अन्य विस्तारित भागात रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये टायफाइड, फ्ल्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. विजापूर परिसरात चिकुनगुनियाची साथ आहे. त्यामुळे तेथून येणार्‍यांंपैकी काहीजण आजारी असल्याचे आढळत आहे.

गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल होत आहे. कधी उन्ह, तर कधी पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम म्हणून  साथीचे आजार पसरत आहेत. टायफाइड, फ्ल्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 

महापालिका क्षेत्रातील वारणाली परिसर तसेच रेल्वे गेटजवळ पुलाचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी खड्ड्यात सतत पावसाचे पाणी साचून राहते आहे. त्याचा परिणाम म्हणून या परिसरात डासांचे प्रमाण वाढून डेंग्यूची लागण  होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने या परिसरात डास प्रतिबंधक फवारणी करावी, तसेच खड्ड्यांत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अशी या परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. 

डेंग्यू नव्हे; डेंग्यूसद‍श्य : डॉ. संजय भावे

उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय भावे म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यामध्ये डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डेंग्यूसद‍ृश्य आजाराचे रुग्ण वाढत असतात.  त्यामुळे अंग दुखणे, हाडे दुखणे, ताप येणे,  प्लेटलेट कमी होणे अशी लक्षणे दिसतात. परंतु ही लक्षणे डेंग्यूची नसून डेंग्यूसद‍ृश्य आजाराची असतात. त्यामुळे तातडीने उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी न घाबरता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा करणे, रुग्ण आढळल्यास सर्वेसाठी महापालिकेला तातडीने कळविणे हे केले पाहिजे. 

लहान मुलांना लागण

डेंग्यूची लागण लहान मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. त्यांच्यामध्ये सौम्य ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगावर लालसर पट्या उठणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. उलट्या, मळमळ असाही त्रास होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण  आहे. परंतु हा सौम्य स्वरुपाचा डेंग्यू असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

टायफाइड, प्ल्यूची साथ

डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, डेंग्यू सद‍ृश्य आजाराची साथ आली आहे. त्याची लक्षणे फ्ल्यूसारखी दिसतात. परंतु डेंग्यूमध्ये ताप पुन्हा पुन्हा येतो. गंभीर स्वरुपाच्या डेंग्यू आजारात अंगावर लालसर पुरळ उठणे, रक्‍तस्त्राव होणे अशी लक्षणे असतात. सध्या तरी रुग्णांमध्ये अशी लक्षणे नाहीत. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. टायफाइड व फ्ल्यूचे रुग्ण मात्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तसेच चिकुन गुनियाचे रुग्णही आढळत आहेत. परंतु चिकुन गुनियाची साथ ही कर्नाटकातील विजापूर  भागात आहे. त्या ठिकाणाहून येणार्‍यांपैकी काहीजण चिकुनगुनियाने आजारी आहेत.

साथीच्या आजारात उपचार महत्त्वाचा

डेंग्यूची साथ सुरू झाल्याने अचानक ताप येणे हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. त्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे जावे. तोंडाला सतत कोरड पडून तहान लागतेे. पोटात मळमळ होऊन उलट्या होतात. त्यामुळे शरीरातील पाणी बाहेर पडत असते. त्यामुळे रुग्णांना सतत पाणी देत राहणे आवश्यक असते. तातडीने औषधोपचार करणे आवश्यक असते. महापालिकेचे रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डेंग्यूसाठी मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी डेंग्यूला न घाबरता उपचार करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.