Wed, Apr 24, 2019 22:00होमपेज › Sangli › डेंग्यूचे थैमान; आरोग्य विभाग बोगस

डेंग्यूचे थैमान; आरोग्य विभाग बोगस

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:27PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी 

तीनही शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान सुरू आहे. मात्र कुठेच उपाययोजना नाहीत. आरोग्य विभाग झोपा काढतो आहे. नव्हे, बोगस हजेरी लावून पगारापुरता पोसला आहे, असा आरोप अनेक सदस्यांनी सोमवारी तहकूब महासभेत केला. कोणाला अधिकार नाहीत, कारवाईचे आदेश होऊनही अधिकारी पाठराखण करीत आहेत, असा आरोपही करण्यात आला. 

अखेर महापौर हारुण शिकलगार यांना बुधवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले.  सौ. अश्‍विनी खंडागळे म्हणाल्या, खणभागात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरली आहे. त्यावर काय उपाययोजना केल्या आहेत? सहायक आरोग्याधिकारी संजय कवठेकर म्हणाले, डेंग्यूचे 49 संशयित व चिकुनगुन्याचे 40 संशयित आढळले असून, प्रत्येकी सहाजण पॉझिटीव्ह आहे. महापालिका हद्दीत आरोग्य सेविकांच्यावतीने सर्व्हे आणि औषधोपचार, औषध फवारणी करण्यात आल्याचा खुलासा केला. 

सुरेश आवटी  म्हणाले, चारही आरोग्य अधिकार्‍यांना काही कळत नाही. त्यांचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम ऐकत नाहीत. यांना कशासाठी पोसले आहे? आयुक्‍तांच्या साक्षीनेच याचा सोक्षमोक्ष करा. 

संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे यांनी घरकुल योजनेच्या बोगसगिरीचा पंचनामा केला. ते म्हणाले,  संजयनगर घरकुल योजनेच्या कामाचा दोन वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. ठेकेदार काम करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा, ठेकेदार बदला. महापौरांनी येत्या आठ दिवसांत काम पूर्ण केले नाही, तर दुसरा ठेकेदार नियुक्त करून काम करण्याचे आदेश दिले.  घरकुल योजनेकडील लिपिक भूपाल मल्लेवाडी यांना निलंबित केल्याबद्दल आवटी यांनी जाब विचारला. ते म्हणाले, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांच्या भेटीवेळी माहिती देण्याचे काम उपायुक्तांचे होते. पण त्या गैरहजर होत्या. कुणीच नसल्याने मल्लेवाडी यांनी मंत्र्यांना माहिती दिली. यात त्यांची चूक काय? त्यांना निलंबित केले, पण उपायुक्तांना मोकळे सोडले आहे.