होमपेज › Sangli › सांगलीत डेंग्यू,काविळीचे थैमान

सांगलीत डेंग्यू,काविळीचे थैमान

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 10:45PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत डेंग्यू आणि काविळीचे थैमान सुरू आहे. दूषित पाणी आणि कचरा उठावाचा बोजवारा उडाल्याने साथींचा फैलाव झाला आहे. उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी एकेका घरात चार-चार रुग्ण आढळून येत आहेत. परंतु आरोग्य विभागाचा सर्व्हेक्षणाचा फार्सच सुरू असून, उपाययोजनेकडे मात्र दुर्लक्ष आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 

महापालिकेने एकीकडे 56 व 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता शहरात बिसलरीसारखे पाणी मिळेल, असाही प्रशासन, कारभारी दावा करीत आहेत. परंतु शहरातील अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नाही. आता तर दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. भरीस भर म्हणून शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग पडून आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन-तीन पावसाने जागोजागी कचर्‍याचे ढीग कुजले आहेत. काही ठिकाणी तळे साचून त्या पाण्यावर डासांच्या अळ्या पोसत आहेत. डासांचा फैलाव  वाढला आहे. नियमित डासप्रतिबंधक औषधफवारणी अनेक भागात होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एकीकडे दूषित पाण्याने शहरात अनेक ठिकाणी पोटदुखी, उलट्या, जुलाबासारख्या आजारांचा त्रास होऊ लागला आहे. काही उपनगरांत काविळीचे रुग्ण वाढले आहेत. डासांच्या फैलावामुळे अनेकांना  डेंग्यू झाला आहे. 

प्रत्येक उपनगरांमध्ये  कावीळ, डेंग्यूचे  रुग्ण आढळून येत आहेत. शहरात अशा रुग्णांची संख्या हजारांहून अधिक आहे. यापैकी बहुसंख्य रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु महापालिकेच्या दफ्तरी मात्र त्यांची कुठेच नोंद नाही. वास्तविक शहरात साथीच्या आजारांचे दैनंदिन सर्व्हेक्षण करण्याची आरोग्य विभागाची पद्धत आहे. त्यासाठी आरसीएच रुग्णालयाची टीमही शहरात फिरते. दुसरीकडे पाण्याचे प्रत्येक भागात  नमुने घेण्याचीही पाणीपुरवठा विभागाची पद्धत आहे. मात्र दुर्दैवाने कोणत्याच यंत्रणेकडून गांभीर्याने तपासणी किंवा सर्व्हेक्षण केले जात नाही.  केवळ कागदोपत्री खेळ सुरू असतो अशी तक्रार आहे. शहरात डेंग्यू, काविळीसारख्या साथींचे थैमान सुरू आहे. तरीही आजार किंवा दूषित पाणी कोठेही रेकॉर्डवर न आणता मनपाकडून सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. याबाबत खुद्द नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

नदी प्रदूषणाचा परिणाम; चुकीचे उपायही धोकादायक

पोटविकार तज्ज्ञ डॉ. उदयसिंह पाटील म्हणाले, गावोगावी सांडपाणी व दूषित पाणी थेट नदीत मिसळून  होणारे प्रदूषण भयावह आहे. शिवाय शुद्ध पाणीपुरवठ्याचा अभाव, भेसळयुक्‍त खाद्य अशा अनेक कारणांनी पोटाचे -विशेषतः- काविळीसारखे विकार बळावतात. वेळेत योग्य निदान आणि  शास्त्रोक्‍त पद्धतीने उपचार गरजेचे असतात. काविळीसारख्या आजारात अशक्‍तपणा वाढतो, त्यासाठी उसाचा रस, लिंबू सरबतसह विविध शक्‍तीवर्धक पेय आवश्यक असते. पण अंधश्रद्धेपायी होणारे  चुकीचे देशी उपचार  धोकादायक असतात. काही ठिकाणी तर  काविळीवरअ‍ॅसिडसारखे पदार्थ औषध म्हणून वापरले जात आहेत. ते बंद झाले पाहिजेत.