Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Sangli › आष्ट्यात डेंग्यू, चिकनगुनियाची साथ  

आष्ट्यात डेंग्यू, चिकनगुनियाची साथ  

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 10:19PMआष्टा : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून आष्टा आणि  परिसरातील काही  गावात हिवताप, डेंग्यू व चिकनगनियाची साथ सुरू आहे. शहरातही डेंग्यूचे 5 ते 6 रूग्ण आढळून आले आहेत.  नागरिकांनी  सावधानता बाळगावी , असे अवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

पालिकेचे आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे व आरोग्य सेवक संजय साबन्नावर  म्हणाले, भिलवडी, अंकलखोप, समडोळी व नदीकाठच्या काही गावांमध्ये हिवताप, चिकनगुनिया व डेंग्यूची साथ आहे. शहरात आढळून आलेले डेंग्यूचे रूग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत.परंतु शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्या, साचलेले पाणी व डबक्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्याठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. जुन्या टायर, बाटल्या व पाणी साचून राहिलेल्या वस्तू जप्त करून नष्ट करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील बी. के. चौगुले व के. सी. वग्याणी विद्यालय, नवोदित विद्यालय, जिल्हापरिषद शाळा नंबर एक, आठ व नऊ येथील विद्यार्थ्यांना हिवताप, चिकनगुनिया व डेंग्यू या रोगांबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. डेंग्यूच्या अळ्या, गप्पी मासे दाखवून व पोस्टर लावून प्रबोधन करण्यात आले. ग्रामदैवत श्री चौंडेश्‍वरी देवीच्या भावई उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागात पावडर, धूर, तेल  व टेमिफॉस लिक्विड फवारणीचे काम सुरू आहे.शहरात काही ठिकाणी सर्दी, ताप व कणकणीचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवून व ड्राय डे पाळून नगरपालिकेला सहकार्य करावेअसे अवाहन करण्यात आले आहे.

शासनाकडून आरोग्याधिकार्‍यांची नेमणूक

शासनाकडून पालिकेसाठी संजय साबन्नावर (आरोग्य सेवक) व बी. बी.कांबळे (आरोग्य सहाय्यक ) हे दोन आरोग्य कर्मचारी मिळाले आहेत. ते हजर झाले आहेत.आणखी एक आरोग्य कर्मचारी  मिळणार आहे.