Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Sangli › जतमध्ये डेंग्यू,चिकनगुनियाची साथ   

जतमध्ये डेंग्यू,चिकनगुनियाची साथ   

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:43PMजत : प्रतिनिधी

जत शहरात डेंग्यू व चिकनगुनिया साथींचा फैलाव झाला आहे. नव्याने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात डेंग्यूचे चार तर चिकनगुनियाचे 2 रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय थंडी, ताप, पेशी कमी होणे, सांधे दुखणे अशा लक्षणांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात 53 घरांमधील डासांची घनता वाढली असल्याचे आढळून आले आहे.  पालिकेने धूर फवारणी व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला आहे.

एक महिन्यापासून  शहरात साथींच्या आजारात वाढ झाली आहे. विद्यानगर, आंबेडकरनगर, शिवाजी पेठ, शंकर कॉलनी, आनंद ग्राऊंड या परिसरात अनेकांना चिकनगुनियासदृश आजार झाल्याची लक्षणे आढळली आहेत. हातापायांचे सांधे दुखणे, ताप येणे अशी लक्षणे दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात कणसेवाडा येथील दोघांना चिकनगुनिया झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोरे कॉलनीमधील चौघांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंग्यूसदृश आजाराची  अनेकांना लागण झाली आहे. मात्र प्रयोगशाळेतील तपासणीत त्यांच्या रक्‍तांत डेंग्यूचे विषाणू आढळून आले नाहीत. रक्‍तांमधील पांढर्‍या पेशीं कमी होण्याचे अनेकांमध्ये प्रमाण वाढले आहे. डेंग्यू किंवा अन्य दुर्धर आजाराने या पेशी कमी होत असतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

साथीचा फैलाव होताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार व त्यांच्या पथकाने  शहरातील 523 घरांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये 6 रूग्ण आढळून आले. सर्व्हेक्षणात डासांची घनता तपासण्यात आली. त्यामध्ये 53 घरांमध्ये इडीस या डासांची घनता वाढल्याचे आढळून आले.  उपनगराध्यक्ष  आप्पा पवार यांनी सांगितले,की शहरात फॉगिंग मशीनच्या सहाय्याने धूर फवारणी सुरू केली आहे. शहरातील शंकर कॉलनी, खाटिक गल्‍ली, आनंदग्राऊंड, शिवाजी पेठ, पोलीस लाईन आदि भागात फवारणी करण्यात आली आहे. शहरातील अन्य भागात फवारणी करण्याचे काम सुरू आहे. शहरातील स्वच्छता मोहिमेस शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. जेसीबीच्या सहाय्याने चिलार काढले जाणार आहे. नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी मोरे कॉलनी, महसूल कॉलनी, कॉलेज वसाहत याठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली.