Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Sangli › तासगावात डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

तासगावात डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 8:33PMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू, चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. शहरातील खासगी रुग्णालयांतून रोज डेंग्यू, चिकुनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र पालिकेकडून मात्र शहरातील स्वच्छतेबाबत कोणतेच गांभीर्य दिसून येत नाही. 

शहरातील सर्व भागांत औषध फवारणी तसेच जगजागृती करणे गरजेचे आहे. शहरातील वरचे गल्‍ली, विटा नाका, मुस्लिम मोहल्‍ला, पुणदी रोड, माळी गल्‍ली, दत्तमाळ परिसरात चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. 

तासगाव शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. तर काही प्रमाणात डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. तर याबाबत ग्रामीण रुग्णालयात कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे दिसून आले आहे. याचवेळी पालिकेकडे वाहन व्यवस्था नसल्याने अद्यापही पूर्ण शहरात औषध फवारणी झालेली नाही.

नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी मात्र सोशल मीडियावर ‘मी नगराध्यक्ष बोलतोय’, अशी पोस्ट टाकली आहे. साथी आलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. मात्र पालिकेकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्यक्षात शहरात कुठेच कृती दिसून येत नसल्याने   नाराजी व्यक्‍त होत आहे. शहरात त्वरित औषध फवारणी तसेच जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.