Sun, Jul 21, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › डेंग्यू, चिकनगुनिया : ३६ गावे संवेदनशील

डेंग्यू, चिकनगुनिया : ३६ गावे संवेदनशील

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:35AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 36 गावे डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप संवेदनशिल आहेत. गेल्या सतरा महिन्यात 176 रुग्ण आढळले आहेत. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे व अन्य उपाययोजना आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू आहेत. डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप नियंत्रणासाठी जनतेचा सहभागही महत्वाचा आणि मोलाचा आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रभारी जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, जूनमध्ये डेंग्यू, हिवताप, मलेरिया जागरण अभियान राबविले जात आहे. डास निर्मुलन आणि रोग नियंत्रणसाठी जनतेचा सहभागही महत्वाचा आहे. घर व परिसरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. गटारी सतत वाहती ठेवावीत. गटारीऐवजी शोषखड्ड्यांचा पर्याय प्रभावी आहे. रॉकेल किंवा जळके ऑईल गटारी, व साचलेल्या पाण्यावर फवारल्यास अथवा टाकल्यास डासांची उत्पत्ती कमी होईल. पाणी साचून राहिलेल्या डबक्यामध्ये, वापरात नसलेल्या विहिरींमध्ये व खाणीमध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडून अळी नियंत्रण करावे. 

आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’

लोकांनी स्वत:च्या घरातील फुटके डबे, टायर्स, रिकाम्या बाटल्या, मडकी आदी टाकाऊ वस्तुंचा नायनाट करून ती नेहमी कोरडी करून ठेवावीत. संध्याकाळी शक्यतो दारे, खिडक्या बंद करून ठेवावीत. शौचालयाच्या सेप्टिक टँकवरील पाईपना कॅप/जाळी बसवावी. वापराच्या पाणी साठ्यांना झाकण बसवावे. आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळावा व पाणी साठवण्याची भांडी घासून पुसून स्वच्छ करावीत. ताप रुग्णांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रक्त तपासून घ्यावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.