Thu, Jan 17, 2019 16:21होमपेज › Sangli › दूध खरेदीत तातडीने वाढ करण्याची मागणी

दूध खरेदीत तातडीने वाढ करण्याची मागणी

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 7:54PMपलूस : प्रतिनिधी   

वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करुन शासनाने दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी पलूस येथे झालेल्या दूधउत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीत करण्यात आली.यावेळी शासनाने तातडीने याबाबत निर्णय घेण्याची मागणी भीमराव साळुंखे, राजेंद्र पाटील, सूर्यकांत मोरे, शिवाजी पाटील, समीर शिंदे, उल्हास पाटील यांनी केली.  तसेच दुधाला जादा दर  मिळण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पलूस तालुका दूध उत्पादक शेतकरी संघाने दूध दराबाबत सुरू असलेल्या मनमानीपणाबाबत  विचारविनीमय करुन  याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी  शेतकर्‍यांची, दूध उत्पादकांची बैठक बोलावली होती. यावेळी उत्पादन खर्चावर आधारित दुधाला दर देण्याची मागणी करण्यात आली.  

गेल्या काही दिवसांपासून खासगी आणि सहकारी दूध संघांनी  शेतकर्‍यांकडून दुधाचा खरेदी दर कमी केला आहे. प्रतिलिटर 26 रुपयांचा खरेदी दर 18 रुपयांवर आला आहे. याचा विचार करुन  शासनाने उत्पादन खर्चावर आधारित  दुधाला   हमीभाव ठरवून देण्याची यावेळी मागणी करण्यात आली.  यावेळी स्पष्ट करण्यात आले की, शासनाने दूध भुकटी आणि निर्यात दुधाला अनुदान देण्याचा  घेतलेला निर्णय शेतकर्‍यांच्या  फारसा उपयुक्त ठरणार नाही.  ही शेतकर्‍यांची केवळ दिशाभूल आहे. अनेक शेतकर्‍यांनी    संतप्त भावना व्यक्त करताना दूध उत्पादन करण्यासाठी  सुका चारा, ओला चारा, पेंड, औषधे आणि इतर खर्च मिळून 31 ते 32 रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च येतो. प्रतिलिटर दहा -बारा  ते चौदा रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती मांडली.