Mon, Jun 17, 2019 14:13होमपेज › Sangli › सांगलीला तालुका करण्याची मागणी

सांगलीला तालुका करण्याची मागणी

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:37PMसमडोळी : वार्ताहर

मिरज पश्‍चिम भागातील जनतेच्या सोयीच्यादृष्टीने सांगली तालुका करण्याची मागणी या भागांतील जनेतेतून होत आहे.  स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी गेल्या काही वर्षापासून  प्रलंबीत असतानाच  स्वतंत्र आष्टा तहसील कार्यालयाचा अट्टाहास   कशासाठी, असा    या  भागांतील काही गावांत  प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या मिरज पश्‍चिम भागातील समडोळी, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी, कसबेडिग्रज, तुंग, मौजे डिग्रज, हरिपूर, अंकली, नांद्रे, कर्नाळ आदी गावांसाठी शासकीय व प्रशासकीय कामासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मिरज तहसीलदार कार्यालयामध्ये जावे लागते. वरील गावांच्या कमी- जास्त कि. मी. अंतराचा विचार करता ही बाब सोयीपेक्षा गैरसोयीचेच ठरत आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी स्वतंत्र सांगली तालुक्याच्या मागणीस जोर दिलेला आहे. असे असतानाच राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आष्टा तहसील कार्यालयाचा प्रस्ताव पुढे येत आहे.  सांगली तालुक्याच्या मागणीला  बगल देऊन जनतेला वेठीस धरण्याचा  उद्योग केला जात आहे. पूर्वीच्या सांगली विधानसभा मतदारसंघातील गावांचा वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आला आहे. आष्टा तहसील कार्यालयाच्या स्थापनेमुळे केवळ पाच ते सात कि. मी. अंतरावरील गावांना सोयीचे ठरणार आहे. समडोळी, कसबेडिग्रज या गावांसाठी ही बाब गैरसोयीची ठरणार असल्याने स्वतंत्र सांगली तालुका निर्मितीऐवजी आष्टा तहसील कार्यालयाच्या प्रस्तावाने कही खुशी, कही गमचे वातावरण वरील भागांमध्ये दिसून येत आहे.