Tue, May 21, 2019 00:51होमपेज › Sangli › कर्जमाफीचे मुख्यमंत्र्यांचे आकडे फसवे 

कर्जमाफीचे मुख्यमंत्र्यांचे आकडे फसवे 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

कर्जमाफीसंदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आकडे फसवे आहेत. राज्यातील बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. मटक्याच्या चिठ्ठीतील आकडे बदलत नाहीत. त्या आकड्यांची विश्‍वासार्हता असते. मात्र मुख्यमंत्र्यांचे कर्जमाफीचे आकडे दररोज बदलत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आकड्यावर कुणाचाच विश्‍वास नाही, अशी टीका सत्यशोधक शेतकरी संघटनेचे नेते किशोर ढमाले यांनी केली. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे शुक्रवारी सांगलीत मार्केट यार्डातील वसंतदादा सांस्कृतिक भवनमध्ये शेतकरी मेळावा झाला. सत्यशोधक शेतकरी संघटनेचे नेते किशोर ढमाले अध्यक्षस्थानी होते. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, बळीराजा शेतकरी संघाचे राज्य अध्यक्ष गणेश जगताप, अंकुश देशमुख, शेतकरी कवी राजेंद्र सोनवणे, अ‍ॅड. अमित शिंदे, महादेव कोरे, अशोक माने, हणमंत पाटील, धनाजी जाधव, वंदना माळी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

आत्महत्या नव्हे खूनसत्र

ढमाले म्हणाले, शेतकरी आत्महत्यांना शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभारत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून ते शासन व्यवस्थेने घडविलेले खूनसत्र आहे. चौतीस हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र घोषणा केलेल्या रकमेची कर्जमाफी द्यायला तयार नाहीत. मुठभर शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शेतकर्‍यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी हवी आहे. शेतीमालाला योग्य दाम मिळाला पाहिजे. भूसंपादनाचा कायदा शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिणा आहे. अंबानी, अदानी यांना मोठ-मोठी धरणे आंदण देण्याचे शासनाचे षड्यंत्र आहे. 

नेहरू ते मोदी सर्वांकडून भ्रमनिरास

रघुनाथदादा म्हणाले, पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी सर्वच प्रधानमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला आहे. शासन नेहमीच भांडवलशहांच्या बाजूने राहिले आहे. ऊस, कापूस आदी सर्वच शेतीमालाला भाव मिळू द्यायचा नाही, असे शासनाचे धोरण आहे.

ते म्हणाले, कर्नाटकात शेतीला वीज मोफत आहे. नदीतील पाण्याला कर नाही. पण महाराष्ट्रात मात्र हा खर्च शेतकर्‍यांच्या माथी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन बेगडी आहे. शेतकर्‍यांनी आता उठाव करून शासन आणि सर्व राजकीय पक्षांना जाग आणली पाहिजे. 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 19 मार्चला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी प्रचंड संख्येने या आंदोलनात सहभाग घ्यावा. दि. 23 मार्चपासून राज्यात शहीद अभिवादन व शेतकरी जागृती यात्रा निघणार आहे. दि. 30 एप्रिलचे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन अभूतपूर्व होईल, असेही ते म्हणाले. 

जगताप म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पिढ्यान्पिढ्या बरबाद झाल्या तरी शेतकरी गप्प का आहेत? काँग्रेसने टाटा-बिर्लांना मोठे केले, आता भाजप अंबानी-अदानींना मोठे करत आहे.  

देशमुख म्हणाले, शेतकरी जागा होत नाही. ताकद दाखवत नाही. रस्त्यावर येत नाही. त्यामुळे शेतीमालाला दर मिळत नाही.