Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Sangli › उलट्या गटारींवर कोट्यवधींचा चुराडा

उलट्या गटारींवर कोट्यवधींचा चुराडा

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 8:01PMसांगली : अमृत चौगुले

शहरात मुख्य रस्ते व उपनगरांमध्ये सांडपाणी निचर्‍यासाठी बांधलेल्या गटारी या केवळ ठेकेदारांचे कोटकल्याण करण्यासाठीच उपयोगी ठरल्या आहेत. आता तर शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर गटारी उंच आणि रस्ते खाली असा अजब प्रकार पहायला मिळतो आहे. कुठेच लाईनलेव्हल नसल्याने सांडपाणी वाहण्याचा प्रश्‍नच नाही. एकूणच अशा उलट्या दिशेने केलेल्या गटारी निरुपयोगीच ठरत आहेत. परंतु वर्षानुवर्षे प्रशासन-ठेकेदार आणि कारभारी अशा गटारींचा कोट्यवधी रुपयांचा कारभार केवळ साखळी पोसण्यासाठीच सुरू आहे. 

सांडपाणी वाहण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सुमारे हजारांहून अधिक गल्ल्या आणि  मुख्य रस्त्यांमध्ये लहान-मोठ्या गटारी आहेत. यातील लहान, मोठ्या गटारी या भोबे पद्धतीच्या गटारींना तसेच काही ठिकाणी  ड्रेनेजच्या चेंबर्सला जोडल्या होत्या. वर्षानुवर्षे या गटारींतून रस्त्यावर पडणारे तसेच घरांतील सांडपाणी वाहून सांगली, मिरजेतील मलनि:स्सारण केंद्रांकडे जात होते. तेथून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जात असे.

उपनगरांमध्येही अशाच प्रकारे लहान-मोठ्या गटारी करण्यात आल्या. या गटारी करताना सांडपाणी नैसर्गिक उताराने जाण्याची पातळी सांभाळणे गरजेचे होते. परंतु ते नियम न पाळता ‘दाखविण्यापुरत्या अर्ध्या, पाईपलाईनच्या गटारी करा आणि टक्केवारीतून लुटा’ असा कारभार सुरू झाला. त्यांचा दर्जाही निकृष्टच  असा आहे. साहजिकच या गटारी सांडपाणी वाहण्यास असमर्थ ठरत गेल्या आहेत.  शिवाय निकृष्ट कामामुळे गटारी कोसळल्या की त्या नवीन करा आणि पुन्हा लुटा असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.

हे करता करता आता गेल्या दोन वर्षांत तर अजब नमुना पहायला मिळतो आहे. शहरातील महापालिका-बसस्थानक रस्ता, सिव्हिल रस्ता, शंभरफुटी रस्त्यासह अनेक ठिकाणी गटारी या रस्त्यापेक्षा फूट-दोन फूट उंच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे पावसाचे, तसेच साठणारे सांडपाणी गटारीत जातच नाही. परिणामी तळे साचून डांबरी रस्ते खराब होत आहेत. साहजिकच रस्त्यांच्या ठेकेदारांनाही हे आंदणच मिळत आहे.

एकूणच अशा कारभाराने गेल्या दहा वर्षांतच तीन शहरात मुख्य रस्ते आणि अंतर्गत उपनगरांमध्ये झालेल्या गटारींवर 50 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. एवढा खर्च होऊनही या गटारीचे सांडपाणी काही हटत नाही. वास्तविक या रस्त्यांच्या कामांची बिले काढताना अधिकार्‍यांनी त्याची लाईनलेव्हल पाहून तपासणी करून घेणे  गरजेचे होते. 

शामरावनगरात कोटीची गटार निरुपयोगी

सांडपाण्याची मोठी डोकेदुखी असलेल्या शामरावनगरात हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून मुख्य रस्त्याला गटार बांधण्यात आली. परंतु ही गटार रस्त्यापेक्षा उंच तर नागमोडी वळणाची, निकृष्ट दर्जाची झाली आहे. सांडपाण्याची पातळी कोठेही सांभाळण्यात आली नाही. त्यामुळे ही गटार निरुपयोगीच ठरत आहे.

नाल्यांवरील अतिक्रमणांचीही भर

शहरातील सांडपाणी वाहण्यासाठी गटारी जेथे ड्रेनेज नाही तेथे नाल्यांना जोडल्या जात होत्या. असे लहान-मोठे सुमारे 100 भर नाले सांडपाणी वाहून नेत होते. परंतु एकीकडे नाल्यावर अतिक्रमणे करून 50 हून अधिक नाले गायब झाले आहेत. त्यामुळे उपनगरांमध्ये सांडपाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसते.