होमपेज › Sangli › सांगलीत मराठा समाजाची मंत्र्यांसमोर घोषणाबाजी

सांगलीत मराठा समाजाची मंत्र्यांसमोर घोषणाबाजी

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:28AMसांगली : प्रतिनिधी

मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून सरकार बरखास्त करावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांना प्रवेश नाकारल्याने त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच सरकार विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर आंदोलकांनी निषेध व्यक्‍त करीत निवेदनाची प्रत प्रवेशद्वारावरच अडकवली आणि ते परत गेेले.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. तासगाव-विटा रस्त्यावर बसच्या काचा फोडण्यात आल्या.  आंदोलनात विलास देसाई, श्रीरंग पाटील, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, सतिश साखळकर, युवराज शिंदे आदि शेकडो कार्यकर्ते   सहभागी झाले होते.  मुख्यमंत्र्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स असल्याने ना. पाटील आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्याच दरम्यान क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी आले. सुमारे शंभरावर कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. 

पोलिसांनी सर्वांना आत जाता येणार नाही, पाच ते दहा कार्यकर्त्यांना सोडले जाईल, अशी भूमिका घेतली. त्यावेळी   कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वादावादीही झाली.  सर्वांना प्रवेश नाकारल्याने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत मंत्र्यासमोरच सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.   या सर्व प्रकारामुळे  काही काळ तणाव निर्माण झाला. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन

दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रास्ता रोको, पुतळा दहन करण्यात आले. विट्यात  बसवर दगडफेक झाली. त्यामध्ये एक महिला जखमी झाली आहे.  इस्लामपूरमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी झाली. 

सांगलीत संमिश्र प्रतिसाद

सांगली शहरात आंदोलकांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. बंदला मात्र शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.