Tue, Sep 25, 2018 04:37होमपेज › Sangli › ‘कर्जमाफी’: ५० हजार खात्यांचे होणार ऑडिट

‘कर्जमाफी’: ५० हजार खात्यांचे होणार ऑडिट

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 24 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सुमारे 50 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांचे सहकार विभागामार्फत ऑडिट होणार आहे. कर्जमाफी योजनेस पात्र, अपात्र खात्यांची शहानिशा होणार आहे. जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व व्यापारी बँकांमधील संबंधित शेतकरी कर्ज खात्यांचे लेखापरीक्षण होणार आहे. 

जिल्ह्यात जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत व खासगी व्यापारी 32 बँकांकडील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे. यामध्ये जिल्हा बँकेकडील शेतकरी संख्या सर्वाधिक म्हणजे 1 लाख 12 हजार आहे. सांगली जिल्हा बँकेकडील 1.12 लाख शेतकर्‍यांना 251 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी व्यापारी बँकांनी जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना किती रकमेचा लाभ दिला, याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडेही नाही. संबंधित बँकांकडील मुख्यालय किंवा विभागीय कार्यालयांकडे ही माहिती आहे. ती माहिती एकत्र करावी लागेल, असे जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

दरम्यान, कर्जमाफी, प्रोत्साहन  अनुदान, ओटीएसचा दिलेला लाभ पात्र शेतकर्‍यांनाच मिळाला का, याची शहानिशा होणार आहे. त्यासाठी सोळा रकान्यांच्या माहितीवरून लेखापरीक्षण होणार आहे. लाभार्थी शेतकर्‍याचे नाव, अर्ज नंबर, कर्ज खात्यांची माहिती, चावडी वाचन, कर्जमाफी योजनेस पात्रतेसाठीच्या अटी, निकषांची पूर्तता व अन्य बाबींवरून लाभार्थी पात्र आहे अथवा नाही, याची शहानिशा सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांमार्फत होणार आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएससाठी अर्ज केलेल्यांपैकी शेतकरी जे शेतकरी अपात्र ठरले आहेत त्यांच्या अपात्रता कारणांचेही ‘ऑडीट’ होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी दिली. 

कर्जखात्यांच्या ऑडीटच्या अनुषंगाने सोमवारी सातारा जिल्हा बँकेत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक व ऑडीटर्स यांची कार्यशाळा झाली. आता कर्जमाफी  लाभार्थींची खाती तसेच अपात्र शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांचे लेखापरीक्षण होणार आहे. जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत व खासगी  व्यापारी बँकांमध्ये जाऊन हे लेखापरीक्षण होणार आहे.

Tags : sangli, Debt waiver issue, 50 thousand accounts,  audited, sangli news,