Tue, Apr 23, 2019 08:08होमपेज › Sangli › अबतक १ लाख शेतकर्‍यांना २२५ कोटी

अबतक १ लाख शेतकर्‍यांना २२५ कोटी

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 12:45AMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हा बँकेकडील 1 लाख 8 हजार शेतकर्‍यांना 225 कोटी 30 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सातवी ‘ग्रीन लिस्ट’ पुढील आठवड्यात येण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी दिली. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाच्या एकूण 6 ‘ग्रीनलिस्ट’ प्रसिद्ध झाल्या आहेत. कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान ओटीएस पात्र शेतकरी 1 लाख 33 हजार 447 आहेत. ते एकूण 297 कोटी 64 लाख रुपयांचे लाभार्थी आहेत. त्यापैकी 1 लाख 8 हजार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. या शेतकर्‍यांना 225 कोटी रुपयांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. 

सहाव्या ‘ग्रीनलिस्ट’मधील 19 हजार 308 शेतकर्‍यांना 34.88 कोटी रुपयांचा लाभ मिळाला. कर्जमाफीची रक्कम कर्जखात्याला, तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 

दरम्यान जिल्ह्यात 6 हजार 992 शेतकरी ‘ओटीएस’साठी पात्र आहेत. या शेतकर्‍यांनी दीड लाखांवरील थकित रक्कम दि. 31 मार्चपर्यंत भरल्यास त्यांना दीड लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम 47 कोटी रुपये आहे. 

कर्जमाफी योजनेचा मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा झाला. सांगलीतून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुधीर काटे तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. राज्यातील 30 हजार शेतकर्‍यांची सातवी ‘ग्रीनलिस्ट’ पुढील आठवड्यात येईल, असे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यातील आणखी एक हजार शेतकर्‍यांना लाभ मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.