Sat, Feb 23, 2019 02:14होमपेज › Sangli › विकास सोसायट्यांकडून कर्जवाटपात मनमानी

विकास सोसायट्यांकडून कर्जवाटपात मनमानी

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 01 2018 8:51PMतासगाव : दिलीप जाधव

शेतात उसाचे एक कांडे सुद्धा नसताना फक्त सात बारावर ऊस दाखवून तालुक्यातील अनेक विकास सोसायट्यांनी बोगस कर्जाची खैरात केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  संचालक मंडळ व सचिवांनी काही बँक अधिकार्‍यांना हाताशी धरुन लाखो रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील 69 विकास सोसायटींच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक 23 शाखांतून शेतकर्‍यांना  कर्जपुरवठा करते. ऊस पीकासाठी कर्जवाटप करताना काही सोसायटी आणि बँकेच्या काही अधिकार्‍यांनी ने संगनमताने सर्व नियम अक्षरक्ष: धाब्यावर बसविले आहेत.        

कर्जासाठी अहवाल देण्यापूर्वी सोसायटी सचिव आणि बँक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या  रानात जाऊन ऊस असल्याची खात्री करण्याची  आवश्यकता आहे. मात्र या नियमाला सचिव व काही बँक अधिकार्‍यांनी  तिलांजली दिली आहे. काही ठिकाणी सोसायटी पदाधिकार्‍यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे बँकेत बसूनच अहवाल दिले आहेत. जे बँक अधिकारी ‘मॅनेज’ होत नाहीत त्यांच्यावर पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचे प्रकार घडले असल्याची चर्चा आहे. तालुका कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीचे आडसाली, नवीन लागण व खोडवा उसाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र 3 हजार हेक्टरच्या आसपास आहे. प्रत्यक्षात जादा क्षेत्रावर पीककर्ज वाटपाचे आकडे आहेत.