Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Sangli › तरुणाला सव्वा लाखाचा गंडा

तरुणाला सव्वा लाखाचा गंडा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 11:52PMविटा : वार्ताहर

सिम कार्ड अपडेट करायचे आहे, असे कारण पुढे करून  व्यक्‍तिगत माहिती घेतली. त्यानंतर मोबाईल नंबरच्या साहाय्याने बँकेत कर्ज प्रकरण केले. तसेच बँक अकौंटवरून 1 लाख 16 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली असून, याबाबत विटा पोलिसांत प्रवीण प्रकाश गायकवाड (रा. नरे, पुणे, मूळ रा. विटा) यांनी फिर्याद दिली आहे. 

गायकवाड हे हिंजवडी येथे इंजिनिअर आहेत. त्यांचे विट्यातील आयसीआयसीआय बँकेत बचत खाते आहे. या खात्यावर त्यांचा पगार जमा होतो. दि. 4 मे रोजी प्रवीण हे कार्यालयात असताना त्यांना एअरटेल कंपनीच्या कस्टमर केअरमधून फोन आला. त्यात तुमचे मोबाईल कार्ड थ्रीजी सिम असून ते फोरजीमध्ये अपडेट करायचे आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार प्रवीण यांना काही सूचना देण्यात आल्या.

त्याप्रमाणे प्रवीण यांनी मोबाईलवर मेसेज पाठविले. दि. 5 मे रोजी त्यांचा सिम कार्ड सुरू न झाल्याने दुसर्‍या मोबाईल नंबरवरून कंपनीला संपर्क साधला. त्यावर त्याला सिस्टीम डाऊन असल्याचे सांगितले. प्रवीण यांनी मला माझा पहिलाच नंबर सुरू करून द्या, असे सुनावले. त्यावर त्या व्यक्‍तीने प्रवीणकडून त्यांच्या बँकेची डिटेल्स आणि डेबिट कार्डबाबत माहिती घेतली. सायंकाळी गायकवाड यांनी ई-मेल उघडला असता त्यांच्या नावावर बँकेतून कर्ज मंजूर झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी कर्ज मागणी केली नसताना त्यांच्या खात्यावर 3 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे निदर्शनास आले. तसेच काही वेळाने त्यांच्या खात्यातून 41 हजार रुपये काढल्याची माहिती बँकेतून मिळाली. गायकवाड यांनी संबंधित खाते बंद करून तशी तक्रार नोंदवून घेण्याची मागणी केली. या दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या खात्यातून पुन्हा 20 हजार आणि 50 हजार रुपयांची रक्‍कम काढल्याचे गायकवाड यांना बँकेतून समजले. तपास उपनिरीक्षक के. एस. पुजारी करीत आहेत.