Wed, May 22, 2019 10:25होमपेज › Sangli › मलनिस्सारण केंद्रात दोघांचा मृत्यू; तक्रार देऊनही गुन्हा नाहीच

मलनिस्सारण केंद्रात दोघांचा मृत्यू; तक्रार देऊनही गुन्हा नाहीच

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 10:24PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात अभियंत्यासह दोघांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ठेकेदार श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पण या घटनेला 24 तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नाही.

कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ महापालिकेचे मलनिस्सारण केंद्र आहे. शनिवारी दुपारी योजनेच्या प्रकल्पातील पंचवीस ते तीस फूट इंटकवेलची (विहिरीची) स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी विठ्ठल शेरेकर यांनी झाकण उघडकले. यावेळी विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून अभियंता उमाकांत देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही गुदमरुन मृत्यू झाला होता. तर दोन कर्मचार्‍यांना वाचविण्यात यश आले होते. 

आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनी याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी रविवारी शहर पोलिसांत ठाण्याच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे ठेकेदार श्रीकांत बुटालासह महाराष्टल जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.उपाध्ये यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भुयारी गटारसह अन्य कामे करण्याचा ठेका एसएमसी कंपनीला दिला आहे. यासंदर्भात पालिकेने या कंपनीशी करारही केला आहे. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक सेवा सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलनिस्सारण केंद्रात कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून कामावर देखरेख न झाल्याने अभियंता देशपांडे व कर्मचारी शेरेकर यांचा बळी गेला आहे. त्यामुळे एसएमसी कंपनी व जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियांत्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, असेही म्हटले आहे.

महापालिकेचे अधिकारीच आले नाहीत...

दरम्यान याप्रकरणी सांगली शहरचे पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शनिवारी रात्री महापालिकेचे कर्मचारी पोलिस ठाण्यात आले होते पण तक्रार न देताच निघून गेले. त्यानंतर रविवारी सकाळी तक्रार देण्यासाठी येतो असे त्यांनी सांगितले होते, पण कोणीच आले नाही. रात्री त्यांना बोलावून घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असेही चौधरी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.