Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Sangli › नापास झाल्याने गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नापास झाल्याने गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:13AMसांगली : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने  गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचा बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ओंकार विजय काळे (वय 19, रा. मोती चौक, बापट मळा) असे त्याचे नाव आहे. दि. 30 मे रोजी दुपारी त्याने गळफास घेतला होता. त्याच्यावर सिव्हीलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  ओंकार  चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावीत शिकत होता. दि. 30 रोजी बारावीचा निकाल असल्याने तो दुपारी बाराच्या सुमारास ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेत गेला होता. निकाल पाहून दुपारी दीडच्या सुमारास तो घरी परत आला. 

घरी आल्यानंतर कोणाशीही काहीही न बोलता तो दुसर्‍या मजल्यावर गेला. नंतर ओंकारने ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला  तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पालकांनी धीर देऊनही  टोकाचे पाऊल...

ओंकारच्या वडिलांनी निकालादिवशी सकाळी घरातून बाहेर पडताना त्याला धीर दिला होता. निकाल काहीही लागो मनाला लावून घेऊ नको असेही सांगितले होते. तरीही ओंकारने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पालकांनी धीर देऊनही त्याने टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात आली.