होमपेज › Sangli › ‘स्वाईन फ्लूसदृश’ने वांगीमध्ये एकाचा मृत्यू 

‘स्वाईन फ्लूसदृश’ने वांगीमध्ये एकाचा मृत्यू 

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 13 2018 12:27AMकडेगाव/देवराष्ट्रे/तासगाव : वार्ताहर

वांगी (ता. कडेगाव ) येथील आनंदराव यशंवत बोडरे (वय 54) यांचा मंगळवारी स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राहुल वारे यांनी दिली. बोडरे यांच्या तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. 

तुरची (ता. तासगाव) येथील अलका गोरखनाथ पोतदार (वय 50) यांचा दहा दिवसांपूर्वी, तर येळावी येथील चंदाराणी सुखदेव गडदे (वय 32) यांचा सोमवारी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात स्वाईन प्लूने मृत्यू झाला होता. आतापर्यंत स्वाईन फ्लूने जिल्ह्यात तिघांचा बळी गेला आहे. गडदे यांचा भाऊ तानाजी बिरू शेंडगे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात, तर वासुंबे येथील तानाजी सीताराम पाटील (वय 54) यांच्या सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

वांगी येथील बोडरे  ताप, खोकल्याने  आजारी असल्यामुळे त्यांना वांगी येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना शनिवारी विटा येथील रुग्णालयात दाखल केले. स्वाईन फ्लू सदृश्य आजार झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र, बोडरे यांना मंगळवारी श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने कराड येथे  नेण्याचे ठरले. मात्र,  वाटेतच त्यांचा मृत्यू झाला .

आरोग्य विभागाचा सर्व्हे सुरू

वांगी येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने   मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरात  घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण  सुरू केले आहे.