Mon, Nov 19, 2018 07:03होमपेज › Sangli › कृष्णेत मृत माशांचा खच

कृष्णेत मृत माशांचा खच

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कृष्णा नदीपात्रात सरकारी घाट, विष्णू घाट परिसरात मृत माशांचा खच रविवारी सकाळी दिसून आला. खालावलेली पाणी पातळी, नदीत मिसळणार्‍या नाल्यांच्या पाण्यामुळे झालेले प्रदूषण यामुळे ऑक्सीजनअभावी शेकडो मासे मृत झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

कृष्णाकाठावरील विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट या ठिकाणी पोहायला येणार्‍यांसह व्यायामासाठी येणार्‍या नागरिक, युवक, महिलांची संख्या अधिक असते. रविवारी सकाळी नदीपात्रात शेकडो मासे मृत झाल्याचे दिसून आले. पाण्याची पातळी खालावली असून बंधार्‍यामुळे त्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे बरेच दिवस पाणी बंधार्‍याजवळ साचून राहिले आहे. 

त्याशिवाय कृष्णेत बहुचर्चित शेरीनाल्यासह तीन नाल्यांचे पाणी थेट मिसळते. शहरातील सांडपाणी वाहून नेणारे हे नाले थेट नदीत मिसळत असल्याने नदीतील पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. त्याशिवाय प्लास्टिक पिशव्या, कचराही नदीत टाकला जातो. तसेच कृष्णा नदीतील सरकारी, माई, स्वामी समर्थ घाटासह वसंतदादा समाधीस्थळाजवळील घाटावर धुणी धुतल्याने, निर्माल्य विसर्जनाने पाणी प्रदूषित होत होते. त्याशिवाय सर्वच घाट अस्वच्छ झाले होते. या परिसरात दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे गावभागातील विसावा मंडळ, कृष्णामाई जलतरण संस्थेने या घाटांच्या स्वच्छतेचा उपक्रम गेल्या महिन्यात हाती घेतला होता. 

या उपक्रमामुळे घाटांची स्वच्छता झाली. मात्र आता पाणी पातळी खालावल्याने तसेच नदीत मिसळणारे चार नाल्यांचे पाणी यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच परिणाम म्हणून नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. नदीत धरणातून पाणी सोडण्याची गरज असून नाल्यांचे पाणी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा प्रदूषित पाण्यामुळे शहरात साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नदीतील मासे खाणे टाळण्याचे आवाहन
दरम्यान, नदीत मृत झालेले मासे विक्री करण्याचा काहींकडून प्रयत्न सुरू आहे. प्रदूषणामुळे नदीत मासे मृत झाल्याची माहितीच नागरिकांना नाही. त्यामुळे नागरिकांनी असे मासे खाण्याचे टाळावे, असे आवाहन सामाजिक संस्थांतर्फे करण्यात आले आहे. त्याशिवाय पाण्यात अळ्यांची संख्याही लक्षणीय असल्याने पाणी उकळून पिण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.