Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Sangli › दलित वस्तीच्या 3.49 कोटींवर ‘पाणी’

दलित वस्तीच्या 3.49 कोटींवर ‘पाणी’

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 07 2018 12:00AMसांगली : प्रतिनिधी

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तींचा विकास (दलित वस्ती सुधार) योजनेंतील 480 कामे दोन वर्षे अपूर्ण असल्याने अनुदानाचे 3.49 कोटी रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. सर्वाधिक फटका जत तालुक्याला बसणार आहे. 76.58 लाख रुपयांना मुकावे लागणार आहे. 

अनुसूचित जाती उपयोेजनांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तींचा विकास अंतर्गत समाजमंदिर, रस्ता, गटर बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे व अन्य विकास कामे केली जातात. दरवर्षी या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र अपूर्ण कामांचाही प्रश्‍न मोठा आहे. 

जिल्ह्यात 480 अपूर्ण कामांवर कामाच्या 90 टक्के रक्कम खर्च झालेली आहे. उर्वरीत 10 टक्के रक्कम खर्च व्हायची आहे. दोन वर्षात कामे पूर्ण झाली नसतील तर शेवटच्या हप्त्याचे 10 टक्के दिले जाऊ नयेत, असा शासन निर्णय जारी झाला आहे. जिल्ह्यात मार्च 2016 पूर्वीची अपूर्ण कामे 480 आहेत. या कामांची 10 टक्के अनुदान हप्त्याची रक्कम 3 कोटी 49 लाख रुपये आहे. अपूर्ण कामांमुळे ही रक्कम आता मिळणार नाही. ती शासन जमा होणार आहे. कामे मुदतीत पूर्ण न करणार्‍यांना हा ‘जोर का झटका’ आहे. 

घरकुले अपूर्ण राहिल्यास ग्रामसेवक, बीडीओ जबाबदार

जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून वसंत घरकुल योजना राबविण्यात येते. लाभार्थीस घरकुलासाठी 1.20 लाखांचे अनुदान दिले जाते. वसंत घरकुलची अनेक कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश समाजकल्याण समिती सभेने दिले आहेत. यापुढे सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची राहील, असेही जिल्हा परिषदेच्या  समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले.