Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Sangli › सहकारी दूध संघांवरील कारवाई मागे : ना. जानकर

सहकारी दूध संघांवरील कारवाई मागे : ना. जानकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

सहकारी दूध संघांवरील कारवाई राज्य शासन मागे घेत असून यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल. तूर्त दि. 1 डिसेंबरपासून करण्यात येणारे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन दुग्ध विकासमंत्री ना. महादेवराव जानकर यांनी बुधवारी औरंगाबाद येथे बैठकी दरम्यान केले. दूध खरेदी दराबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

या बैठकीची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष व राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. ती अशी ः बैठकीस अध्यक्ष पाटील, गोपाळराव मस्के, महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, खा. रणजित मोहिते-पाटील यांच्यासह राज्यातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित होते. ना. जानकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. 

शासनाने सहकारी दूध संघांना दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 27 रुपये देण्याची सक्ती केली होती. कारवाईचा इशारा दिला होता. शासनाच्या  या निर्णयाविरोधात काही संघांनी न्यायालयात धाव घेऊन या होणार्‍या कारवाईस स्थगिती घेतली आहे. दरम्यानच्या काळात सहकारी दूध संघांच्या पदाधिकार्‍यांनी ना.जानकर यांची भेट घेऊन चर्चा केली. 

कारवाई मागे...

दूध खरेदीसाठी प्रतिलिटर 7 रुपये अनुदान द्यावे, शासनाने अतिरिक्त दूध खरेदी करावे, शालेय पोषण आहारामध्ये दूध भुकटीचा समावेश करावा, दूध पावडरीसाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. ना. जानकर यांनी सहकारी दूध संघावरील  कारवाई मागे घेत असल्याचे जाहीर केले. 

ना. जानकर म्हणाले, दूध खरेदीबाबत निर्णय घेण्यासाठी दुग्ध विकास खात्याचे सचिव, आयुक्त व दूध महासंघाचे कार्यकारी संचालक यांची त्रिसदस्यीय समिती गठण केली आहे.  समितीचा अहवाल आल्यानंतर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.