Mon, May 20, 2019 18:38होमपेज › Sangli › डोक्यावर पत्र्याची पेटी..खिशात ११ रूपये..साकारलं विद्यापीठ

डोक्यावर पत्र्याची पेटी..खिशात ११ रूपये..साकारलं विद्यापीठ

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 1:05PMपतंगराव कदम यांना सतत विकासकामांचा, नवीन स्वप्ने पाहण्याचा व ती साकार करण्याचा ध्यास. अशी ध्येयवेडी माणसेच समाजाला समर्थ करीत असतात. पतंगराव त्यातलेच एक!  सोनसळसारख्या एका लहानशा खेड्यातून पुण्यात येऊन त्यांनी उभा केलेला हा शिक्षण संस्थाचा संसार पाहिला म्हणजे आश्‍चर्य वाटते! आतापर्यंत पुण्याने शिक्षणाचे मार्गदर्शन केले. पण, आता पतंगराव यांच्यासारखे खेड्यातील तरुण ते करू लागले आहेत.     
- ना. यशवंतराव चव्हाण, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार

सांगली ः प्रतिनिधी

डॉ. पतंगराव कदम यांचे सांगली जिल्ह्यातील सोनसळ हे गाव. 8 जानेवारी 1944 मध्ये डॉ.पतंगराव कदम यांचा जन्म झाला. त्याचे वडील श्रीपतराव कदम  प्रगतशील शेतकरी होते. आपली सर्व मुले उच्च शिक्षित व्हावी अशी त्यांची आणि  डॉ. कदम यांच्या मातोश्रींची इच्छा होती. थोरले चिरंजीव मोहनराव यांनी  कडेगाव येथील सोसायटीमध्ये सेक्रेटरी म्हणून नोकरी केली. त्यामुळे घरखर्चाला थोडाफार हातभर लागला. डॉ.पतंगराव यांचे  4 थीपर्यंतचे  शिक्षण गावात झाल्यानंतर त्यांनी शिरसगाव येथे 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हायस्कूल शिक्षणासाठी कुंडलमधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला.

कमवा आणि शिका’ या योजनेंतर्गत  त्यांनी 11 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. कुंडलच्या बोर्डिंगमधील तांबटकाका यांनी सोनसळच्या या हिर्‍याला पैलू पडण्याचे महत्वाचे काम केले.त्या काळात डॉ. पतंगराव यांच्या मनावर क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा ठसा उमटला. याचा प्रभाव डॉ. कदम यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर दिसून येतो. मॅट्रिक झाल्यावर डॉ. पतंगराव यांनी सातारच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एफवाय बीए झाल्यावर त्यांनी टिचर्स डिप्लोमा केला. घरची परिस्थितीत ओळखून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. हडपसरला शिक्षकाची नोकरी पत्करली. डोक्यावर पत्र्याची पेटी आणि खिशात अकरा रुपये घेवून त्यांनी पुण्याला प्रस्थान केले.  शिक्षकाची नोकरी करीत गरीब मुलांसाठी काही तरी करावे या उद्देशाने आपले निवडक साथीदार बा.ग.पवार, वसंतराव म्हेत्रे, महादार सर, निलाखे सर अशा पाच लोकांना घेऊन 10 मे 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली.

मृत्यूची बातमी...आणि अवघा जिल्हा हळहळला

भारती विद्यापीठ नावाचे साम्राज्य 

ग्रामीण भागातील मुले इंग्रजी आणि गणितामध्ये कमी पडतात, यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे डॉ. कदम यांना वाटले. त्यांनी या अवघड विषयांच्या परीक्षा भारती विद्यापीठमार्फत सुरू केल्या.  विद्येच्या माहेरघरात  म्हणजे पुण्यात भारती विद्यापिठाचा बोर्ड लागला, त्यावेळी अनेकांनी टीकाही केली. परंतु पतंगराव डगमगले नाहीत. त्याकाळात जवळपास 1500 परीक्षा केंद्रे सुरु झाली. इंग्रजी व गणित विषयांच्या परीक्षार्थींची संख्या जवळपास दोन लाखांवर गेली. 1969 मध्ये भारती विद्यापीठाच्या विस्ताराला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांनी डॉ.पतंगरा यांची जिद्द आणि धडपड पाहून चार एकर जागा दिली. या ठिकाणी शंकरराव मोरे विद्यालय सुरू करण्यात आले. 

1971 मध्ये या पंचरत्नाच्या पंक्तीत आणखी एक रत्न येवून मिळाले ते म्हणजे आनंदराव पाटील. हळूहळू पुण्यात भारती विद्यापीठाचा पसारा वाढत गेला. 1978 मध्ये भारती विद्यापीठाला उच्च शिक्षणासाठी परवानगी मिळाली. याकाळात डॉ. कदम यांनी चार महाविद्यालये सुरु करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. भारती विद्यापीठाचे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेले.

अजातशत्रू  राजकारणी हरपला

जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण 
भारती विद्यापीठाचे वाढते साम्राज्य आणि गुणवत्ता पाहून 10 मजली इमारतीला परवानगी मिळाली. 1984 मध्ये पुण्यातील पहिली 10 मजली इमारत म्हणून भारती विद्यापीठाचे नाव कोरले गेले. याच काळात महाराष्ट्र शासनाने धनकवडी येथे भारती विद्यापिठाला 70 एकर जागा दिली. त्या ठिकाणी मेडिकल, डेंटल, इंजिनिअरिंग कॉलेज आणि भारती हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली.

भारती विद्यापीठच्या शाखांचा विस्तार 
‘गतीमान शिक्षणातून समाजपरिवर्तन’ हे ध्येय मनात ठेवून वयाच्या 19 व्या वर्षी कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. गेल्या 54 वर्षांमध्ये भारती विद्यापीठ ही अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण देणार्‍या 179 शैक्षणिक शाखा आहेत.धनकवडी, एरंडवणे, दिल्ली, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, कडेगाव, पलूस या शहरात 10 शैक्षणिक संकुले आहेत. हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विशेष करून गोरगरीबांच्या मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण दिले जाते हे खास वैशिष्ठ. सामान्य लोकांच्या  विद्यार्थ्यांची वर्षाला कोट्यवधी रुपयांची फी माफ केली जाते. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, हॉटेल व्यवस्थापन, विधी, सामाजिक शास्त्रे, समाजकार्य, वास्तूरचनाशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शारीरिक शिक्षण, दृश्य कला, कृषी, जैविक तंत्रज्ञान, नेत्रविद्या, श्रवणशास्त्र, छायाचित्रकला आदि अभ्यासक्रम भारती विद्यापीठात शिकविले जातात.

एसटी बोर्डावर निवड, हजारो युवकांना नोकर्‍या 
दरम्यानच्या काळात डॉ. कदम यांची जिद्द, चिकाटी व कामाचा आवाका  पाहून यशवंतराव मोहिते यांनी त्यांना  एसटी  बोर्डचे मेंबर केले. डॉ. पतंगराव यांनी एसटीचे रुपडे बदलले. गाव तेथे एसटी सुरु केली. ग्रामीण भागातील आणि विशेष करून सांगली जिल्ह्यातील  हजारो बेरोजगार  युवकांना एसटीमध्ये नोकर्‍या  लावल्या. याच काळात त्यांनी सांगलीचा स्वतंत्र विभाग सुरु केला.सांगली, विटा  व कडेगावला  आधुनिक बसस्थानक बांधले. दळणवळण वाढल्याने कडेगाव, पलूस तालुक्यांची बाजारपेठ फुलली.

...अन् छिंदम प्रकरणी पोलिसही आले बुरख्यात!

समाजकारणासाठी राजकारण  
डॉ. पतंगराव कदम यांनी समाजकारणासाठी राजकारणात उडी घेतली. आमदार म्हणजे काय, मंत्री म्हणजे कसा असतो,  तसेच आमदार  व मंत्र्यांची कामे काय असतात,लोकांची  कामे कशी करायची, हे त्यांनी दाखवून दिले. मतदार संघाबरोबर त्यांनी जिल्ह्यातील विकासाला चालना दिली. विकासकामात त्यांनी कधी द्वेष भावना दाखवली नाही. सिंचन योजना सुरु व्हाव्यात म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले. कडेगाव व पलूस तालुक्यांची निर्मिती करून विकासाला वाव दिला.  मतदारसंघातील, जिल्ह्यातील रस्ते त्यांनी एकमेकांना जोडले. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय केली. मतदार संघात शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यामुळे हजारो मुली शिक्षण घेताना दिसत आहे.राजकारणात राहून मतदार संघासाठी एवढे काम करणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही.             
- रजाअली पिरजादे, कडेगाव

याला जीवन ऐसे नाव...
यशवंतराव चव्हाण, वसंतदादांच्या विचारांचे खरे वारसदार माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यात  नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्याचे महत्त्वाचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा यांच्या विचारांचा खरा वारसा डॉ. कदम यांनी चालविला. अत्यंत तडफदारपणे निर्णय घेतले. ते अंमलातही आणले. 

सर्वांशी दोस्ताना 
डॉ. पतंगराव कदम यांचा सर्वांशी दोस्ताना होता. त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांचे चाहते आणि मित्र होते. राजकारणात त्यांचे सर्वच पक्षाशी चांगले संबध राहिले. त्यामुळे राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी पतंगराव यांची कामे सहज होत होती.

आई-वडिलांवर प्रेम 
डॉ.कदम यांचे आई-वडिलांवर मोठे प्रेम होते. त्यासाठी त्यांनी आई-वडिलांच्या नावे ट्रस्ट स्थापन केला. त्याद्वारे लोकांना मदत केली. आईच्या नावाने त्यांनी आदर्श माता पुरस्कारही सुरू केला. त्याद्वारे राज्यातील अनेक आदर्श मातांचा गौरव केला.

विकासकामांत सर्वांना मदत 
डॉ. कदम यांनी विकासकामात सर्वांना मदत केली. तो आपला आहे, की परका याचा विचार कधीच केला नाही. त्यांच्या धोरणामुळेच कडेगाव-पलूस मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे. पलूस व कडेगाव तालुक्यातील विकासकामात त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांनाही मदत केली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या प्रकल्पांना भेटही दिली. 

मित्र असावा तर असा 
डॉ. कदम यांनी आपल्या मित्रांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून राहिलेले मित्र आजही भारती विद्यापीठामध्ये काम  करतात. भारती विद्यापीठ, विविध सहकारी संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना नेहमीच मदतीचा  हात दिला. 

अनोखे बंधूप्रेम 
डॉ. कदम यांना सात भाऊ आहेत. सर्वच बंधूंना त्यांनी प्रेम व पाठबळ देऊन त्यांना उभे केले. बंधूप्रेम कसे असावे, हे डॉ. कदम यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आमदार मोहनराव कदम यांना ते नेहमीच वडिलांसमान मानत. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी त्यांनी पुढाकार घेतला.  अथक परिश्रम घेतले.

उत्तुंग राजकीय कारकीर्द 

1968 मध्ये एस.टी. महामंडळाच्या सदस्यपदी निवड. डॉ. कदम यांनी ‘गाव तेथे एस.टी.’ अशी भूमिका घेऊन गावा-गावांत एस.टी. पोहोचवली. महामंडळात हजारो बेरोजगार युवकांना नोकर्‍या दिल्या.

1980 मध्ये भिलवडी-वांगी मतदारसंघात अपक्ष म्हणून लढविलेल्या निवडणुकीत पोस्टाची 55 मते कमी पडल्याने विजयाची हुलकावणी.

1985 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकाची मते घेऊन विजयी. आमदार होताच विकासकामांचा धडाका.

मतदारसंघातील विकासकामे आणि पक्ष निष्ठा पाहून 1990 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यावेळी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार. 29 जून 1992 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून निवड. शिक्षणमंत्री म्हणून काम करताना धाडसी धोरण आखून शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविली.

1995 व  त्यानंतर 1996 च्या  पोटनिवडणुकीतही निसटता  पराभव. तरीही भारती विद्यापीठ, साखर कारखाना, सूतगिरण्या, शाळा, महाविद्यालये या माध्यमातून विकासकामांचा धडाका.  

1999 मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. या निवडणुकीत डॉ. कदम विजयी झाले. यावेळी त्यांना उद्योग व जलसंधारण खात्याच्या मंत्रिपदाची संधी मिळाली. 1999 ते 2003 या कालावधीत मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते.

2004 च्या निवडणुकीत डॉ. कदम यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्याने  विजय  मिळविला. यावेळीही त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. यावेळी डॉ. कदम सहकारमंत्री  झाले. अनेक महत्त्वपूर्ण  निर्णय घेऊन त्यांनी मरगळ आलेल्या सहकार खात्याला नवसंजीवनी दिली. 

2008 मध्ये डॉ. कदम यांना महसूल मंत्री हे महत्त्वपूर्ण खाते मिळाले. त्यांनी या खात्याला आपल्या कर्तृत्वाने नवी झळाळी दिली. 

2009 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डॉ. कदम यांच्याकडे वने, मदत व पुनर्वसन खाते आले. अनेक दमदार निर्णय घेत दुर्लक्षित असलेल्या या खात्याला नवा आयाम दिला. 

मोदी लाटेतही गड राखला 
2014  मध्ये संपूर्ण  देश आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली. या लाटेत  डॉ. पतंगराव कदम यांनी आपला  गड कायम राखला. 

औदार्याचे अनेकवेळा दर्शन...
डॉ. पतंगराव कदम यांनी ‘पलूस-कडेगाव’ या  मतदारसंघाचे अत्यंत प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. कदम यांचे  राजकारण हे वचनपूर्तीचे, विकासकामांचे होते. ‘राजकीय सत्ता ही समाजसेवेचे साधन आहे,’ अशी  त्यांनी कायम भूमिका घेतली. मतदारसंघामध्ये त्यांनी ग्रामीण विकास, सहकार, शिक्षण, क्रीडा, उद्योग, कृषी व आरोग्य  अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनेक योजना भान ठेवून आखल्या आणि बेभान होऊन जिद्दीने पूर्ण केल्या. डॉ. कदम यांच्या मनाच्या औदार्याचे दर्शन अनेकवेळा हजारोंनी अनुभवले. कडेगाव-पलूस मतदारसंघाच्या विकासासाठी ते 40 वर्षे अखंड व अवितरपणे कार्यरत राहिले. अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांनी विकासाची गंगा समाजाच्या सर्वस्तरापर्यंत पोहोचवली. त्यांच्यामुळे असंख्य कुटुंबांचे जीवन सुखावह झाले आहे.