Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Sangli › ‘डीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ; ४०० प्रवेश रिक्‍त

‘डीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ; ४०० प्रवेश रिक्‍त

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:48PMसांगली : प्रतिनिधी

डी.एल.एड्. (डी.एड्.) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे डी. एड्. कॉलेजमधील 395 प्रवेश रिक्त राहिले आहेत. प्रवेशासाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी दि. 6 ते 10 ऑगस्ट ही मुदत आहे. 

जिल्ह्यात डी. एड्. कॉलेज 28 आहेत. सन 2018-19 मधील ऑनलाईन प्रवेशासाठी 11 कॉलेजनी सहभागच घेतला नाही. उर्वरीत 17 डी.एड्. कॉलेजची प्रवेश क्षमता 777 आहे. मात्र 382 प्रवेशच झाले आहेत. उर्वरीत 395 प्रवेश विद्यार्थ्यांअभावी रिक्त आहेत. गेल्या आठ-दहा वर्षात शिक्षक भरती न झाल्याने विद्यार्थ्यांनी डी. एड्. अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. 

प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड्.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या चार फेर्‍या झाल्या आहेत. मात्र अद्याप शासकीय कोट्यातील प्रवेश शिल्लक आहेत. त्यामुळे विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने हे प्रवेश भरले जाणार आहेत. प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एमएए डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

बारावी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.50 टक्के, मागासवर्गीय संंवर्ग 44.0 टक्के) ही प्रवेशाची शैक्षणिक पात्रता आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत दि. 6 ते 10 ऑगस्ट आहे. पडताळणी केंद्रावर जाऊन मूळ प्रमाणपत्रे पडताळणी दि. 6 ते 11 या कालावधीत होणार आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून अ‍ॅप्रूव्ह घेतला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी  तसेच ज्यांचा अर्ज अपूर्ण व दुरुस्तीमध्ये आहे, नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुकांनी अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. सलगर यांनी केले आहे.  

सांगली जिल्हा...!

जिल्ह्यात डी. एड्. कॉलेज : 28
प्रवेश प्रक्रियेत सहभागी कॉलेज : 17
 17 कॉलेजची प्रवेश क्षमता : 777
सन 2018-19 साठी झालेले प्रवेश : 382
रिक्त प्रवेश : 395

भरती सुरू होणे गरजेचे

सन 2010 नंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. सन 2012 मध्ये भरतीबंदी आदेशानंतर खासगी शाळांमध्येही भरती झाली नाही. या सार्‍याचा परिणाम म्हणून  डी.एड् पदविकाधारकांची बेरोजगारी वाढली. त्याचा परिणाम डी. एड्. कॉलेजच्या प्रवेशावर झाला आहे.  शिक्षक भरती सुरू झाल्यास विद्यार्थी डी. एड्. अभ्यासक्रमाकडे वळतील.