होमपेज › Sangli › कराडजवळ साडेचार कोटींचा दरोडा

कराडजवळ साडेचार कोटींचा दरोडा

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 20 2018 1:39AM



कराड : प्रतिनिधी

पोलिस असल्याचा बनाव करून विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलिस उपअधीक्षक व अन्य एकाचे अपहरण केल्याचा धक्‍कादायक प्रकार मंगळवारी दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) येथे घडला. 

ऊसतोड मजुरांचे करार करण्यासाठी संबंधित कराड येथे आले असताना ही घटना घडली. या सिने स्टाईल प्रकारामुळे कराड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यभर तपास चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यात रोख रकमेसह काही संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर गुरूगौडा बिरादार यांच्या फिर्यादीवरून अनोळखी आठ ते दहा जणांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्नाटकमधील हिरेबेन्‍नूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील ज्ञानयोगी स्वामी शिवकुमारजी शुगर कारखान्यास ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीने सुमारे 172 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. तसेच याच फायनान्स कंपनीबरोबर ऊसतोड व वाहतूक टोळ्यांचा करार करण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी 2.30 वा.च्या सुमारास कराड येथील हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर बिरादार, सुभाष पाटील, दिलीप म्हात्रे, मोहन भाई व निवृत्त पोलिस उपअधीक्षक चौकीमट आले होते. 

दरम्यान, हॉटेलमधून कराडकडे येत असताना उपमार्गावर गोटे (ता. कराड) नजीक दोन इनोव्हा कार त्यांच्या गाडीच्या आडव्या मारण्यात आल्या. आठ ते दहा लोक या दोन्ही इनोव्हा कारमधून उतरले. त्यांनी कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना व त्यांच्या सोबत असणार्‍या लोकांना गाडीतून खाली उतरवून आम्ही पोलिस आहोत, तुम्ही क्राईम ब्रँचला चला, असे म्हणत काठीने मारहाण केली. त्यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोकड असणार्‍या बॅगा जबरदस्तीने हिसकावून घेऊन चौकीमट व अन्य एकास गाडीत घालून हल्लेखोर चिपळूणच्या दिशेने पसार झाले. 

तिघे संशयित ताब्यात संगमेश्‍वर : वार्ताहर

वाहनासह तिघांना संगमेश्‍वर पोलिसांनी सायंकाळी  ताब्यात घेतले. पोलिसांनी गुप्‍तता पाळली असून, उर्वरित साथीदारांना पकडण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये संगमेश्‍वर पोलिसांनी ह्युंदाई गाडीसह गजानन महादेव तदडीकर (वय 45, रा. बदलापूर), विकास कुमार मिश्रा (30, रा. जोगेश्‍वरी, मुंबई), महेश कृष्णा भांडारकर (53) ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी दोघेजण इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोळंबे येथे ताब्यात घेण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी आणण्यासाठी संगमेश्‍वर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.