Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Sangli › पिकांवरील किडीसाठी क्रॉपसॅप योजना

पिकांवरील किडीसाठी क्रॉपसॅप योजना

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 9:50PMसांगली : प्रतिनिधी

प्रमुख फळ पिके आणि इतर पिकांवरील कीड रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी  क्रॉपसॅप योजना राबविण्यात  येणार आहे. 41 कोटी 47  लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळिंब,  केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण आणि सल्ला अशी ही योजना आहे.  

सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकावरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्यादृष्टीने   कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप राबविण्यात येत आहे. त्या शिवाय आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख फळ पिकांसाठी  2011-12 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून हॉर्टसॅप प्रकल्प राबविण्यात येत आहे.  क्रॉपसॅप व हॉर्टसॅप प्रकल्पांची एकसमान कार्यपद्धती विचारात घेऊन दोन स्वतंत्र योजना न राबविता फळ पिकांचा क्रॉपसॅप योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पिकांवरील कीड आणि रोगाचे विविध टप्प्यावर काटेकोरपणे व नियमितरित्या परीक्षण व त्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला प्राप्त करुन शेतकर्‍यांना कालमर्यादेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांच्या सहभागाने करण्यात येणार आहे.  योजनेच्या नियोजन व संनियंत्रणासाठी राज्यपातळीवर कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे.क्रॉपसॅप योजनेंतर्गत पिकांवरील प्रमख कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मोबाईल अ‍ॅपद्वारे आणि एसएमएसद्वारे  शेतकर्‍यांना सल्ला देण्यात येणार आहे. संबंधित पिकाच्या विकासाच्या विविध  टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाण, आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचण्यापूर्वी संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण करावे.  त्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि सल्ला प्राप्त केला जाणार आहे.