Fri, Jul 19, 2019 18:15होमपेज › Sangli › पीक विमा भरपाईस विलंब; वेळापत्रक धाब्यावरc

पीक विमा भरपाईस विलंब; वेळापत्रक धाब्यावर

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 10:58PMसांगली : प्रतिनिधी

हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2017 मधील पिकाच्या भरपाईची रक्‍कम अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. तीन महिने ही भरपाई रखडली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना दि. 7 जूनपर्यंत भरपाई रक्कम देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत. त्यास आता पाच दिवस उरले असले तरी विमा कंपनी शांत असल्याचे दिसत आहे. भरपाईची रक्कम किती शेतकर्‍यांना किती मंजूर झाली याची माहितीही अजून विमा कंपनीने जिल्हा बँकेला कळविली नाही. 

जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 524 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2017 च्या खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. 70 हजार 672 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा संरक्षित केलेले आहे. विमा संरक्षित रक्कम 290 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत निर्धारित केलेली होती. पण प्रत्यक्षात सहभागी झालेले शेतकरी व उतरविलेला विमा पाहता विमा संरक्षित रक्कम 169 कोटी 96 लाख रुपये आहे. विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांमध्ये जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान भरपाईच्या रकमेकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. खरीप 2018 च्या खर्चासाठी ही रक्कम शेतकर्‍यांना उपयोगी पडणार आहे. 

शासन हिस्सा 29.44 कोटी; शेतकरी हिस्सा 3.39 कोटी

विमा हप्त्यापोटी शासन व शेतकरी हिश्याची रक्कम 32 कोटी 84 लाख 15 हजार 614 रुपये आहे. यामध्ये केंद्र शासन हिस्सा 14 कोटी 72 लाख 10 हजार 742 रुपये व राज्य शासन हिस्सा 14 कोटी 72 लाख 10 हजार 742 रुपये आहे. शेतकर्‍यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम 3 कोटी 39 लाख 94 हजार 125 रुपये आहे.  विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला भरलेली आहे. 

कंपनीकडून विलंबची शासनाने दखल घ्यावी : दिलीप पाटील

बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शासनाने निश्‍चित केलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 फेब्रुवारी 2018 च्या दरम्यान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळणे आवश्यक होती. मात्र, जून महिना सुरू झाला तरी अद्याप विमा कंपनीकडून भरपाईची रक्कम आलेली नाही. विमा कंपनी भरपाईचे वेळापत्रक पाळत नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कंपनीस आदेश द्यावेत.